मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांनी कुलगुरुपदासाठी अर्ज करताना व्याख्याते म्हणून आपल्या अनुभवाची कागदपत्रे सादर करताना दिशाभूल केल्याचा दावा मंगळवारी वेळुकरांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.
वेळुकर यांनी कुलगुरूपदासाठी अर्ज करताना आपल्या पात्रतेविषयीचे तपशील पुरविताना अप्रामाणिकपणा दाखवत दिशाभूल केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या विविध याचिकांवर पुन्हा एकदा न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सोमवारच्या सुनावणीत डॉ. ए. डी. सावंत यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. त्या वेळी कुलगुरुपदासाठी अर्ज करण्याची ३० एप्रिल २०१० ही अंतिम मुदत असतानाही वेळुकर यांनी १ मे २०१० रोजी अर्ज केला आणि मुदतवाढ दिल्याचे कुठेही प्रसिद्ध न करता निवड समितीने त्यांचा अर्ज स्वीकारल्याचा दावा या वेळी अन्य करण्यात आला. त्यावर हे लेखी स्वरूपात लिहून देण्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली होती.  
वसंत गणू पाटील या आणखी एक याचिकाकर्त्यांनी मंगळवारी त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करीत वेळुकर यांनी कुलगुरुपदाची नियुक्ती निश्चित करण्यासाठी व्याख्याते असल्याच्या अनुभवाचीही दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर केल्याचा दावा केला. सप्टेंबर १९८५मध्ये वेळुकर यांची व्याख्याते म्हणून नियुक्ती झाली. परंतु कुलगुरुपदाचा अर्ज करताना मात्र त्यांनी १९८३मध्ये आपली व्याख्याते म्हणून नियुक्ती झाल्याचे म्हटले.
या पूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळीही त्यांनी तसा दावा केला. परंतु त्यांनी केवळ वर्ष नमूद केले असल्याकडे पाटील यांचे वकील पंकज गवळी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय त्यांनी कुलगुरुपदासाठी एक दिवस उशीरा अर्ज केल्याचा आणि मुदतवाढ दिल्याची कुठलीही जाहिरात निवड समितीने दिली नसल्याचा दावा केला. वेळुकर आणि अन्य प्रतिवाद्यांनी यावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतल्याने न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी त्यावरील सुनावणी ठेवली आहे.