‘प्रवेश नियंत्रण समिती’ची मान्यता न घेतल्याने विद्यार्थ्यांचे निकाल रखडलेल्या बदलापूरमधील ‘लीलावती आव्हाड इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च’ या वादग्रस्त महाविद्यालयाच्या नावातून माझ्या आईचे नाव वगळा, अशी नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला दिली आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही संबंधित महाविद्यालयाने आव्हाड यांच्या आईचे नाव आजपावेतो वगळलेले नाही हे विशेष.
या महाविद्यालयाने गेली चार वर्षे प्रवेश करताना घातलेल्या घोळामुळे विद्यार्थी कसे भरडले जात आहेत, या संबंधातील वृत्त ‘लोकसत्ता’ने २९ मार्चला दिले होते. त्यावर ‘हे महाविद्यालय आपल्या आईच्या नावाने असले तरी त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही,’ असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयाने आपल्याकडे शिकत असलेल्या एकाही विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला नियमाप्रमाणे ‘प्रवेश नियंत्रण समिती’कडून मान्यता मिळविलेली नाही. त्यामुळे, मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयातील
सर्व विद्यार्थ्यांचे निकाल यंदा रोखले आहेत.
आव्हाड यांनी १० जानेवारी, २०१४ ला संबंधित महाविद्यालयाला पत्र लिहून आपल्या आईचे नाव वगळण्यात यावे, असे स्पष्ट केले होते. ‘आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्यात आलेले माझ्या आईचे नाव आपण तातडीने काढून टाकावे असे मी आपणाला वारंवार कळविले आहे. असे असतानाही आजपावेतो त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. येत्या २१ दिवसांत आपल्या आईचे नाव काढले नाही तर कायेदशीर कारवाई करावी लागेल,’ असा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे.
या पत्राला २५ जानेवारी रोजी उत्तर देताना महाविद्यालयाने आव्हाड यांच्या आईचे नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे म्हटले आहे. नाव बदलण्याबाबत एआयसीटीई, मुंबई विद्यापीठ आदी संस्थांशी पत्रव्यवहार सुरू आहे. याकरिता काही कालावधी जाणार आहे,’ असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.