मूल्यांकनाचे नियम धाब्यावर बसवून टीवायबीकॉमसह विविध विषयांची उत्तरपत्रिका तपासणी सुरू असल्याचा आरोप संपकरी प्राध्यापकांच्या संघटनेने केला आहे. प्राध्यापकांनी या संबंधात कुलगुरू आणि परीक्षा नियंत्रकांना पत्र पाठविले आहे.
प्राध्यापकांच्या राज्यस्तरीय संघटनेने नेट-सेटबाधित प्राध्यापक व वेतन फरकाच्या प्रश्नावरून परीक्षाविषयक कामकाजावर ४ फेब्रुवारीपासून बहिष्कार टाकला आहे. मॉडरेटर आणि वरिष्ठ परीक्षकांच्या मदतीने उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण करणे शक्य नाही. फारच थोडे प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर हजेरी लावत आहेत. विनाअनुदानित महाविद्यालयातील मान्यता नसलेल्या शिक्षकांच्या मदतीने टीवायबीकॉमच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे. नियम धाब्यावर बसवून केल्या जाणाऱ्या या उत्तरपत्रिका मूल्यांकनामुळे परीक्षांचा दर्जा घसणार आहे, असे सांगत मूल्यांकनाचे काम थांबविण्यात यावे, अशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे.
उत्तरपत्रिका तपासणी सुरू करण्याआधी गुणदान कसे करायचे यासाठी परीक्षकांची बैठक घ्यावी लागते. मात्र, ही बैठक न घेताच उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, ज्यांचा अध्यापनाचा अनुभव दोन वर्षेही नाही अशा अननुभवी शिक्षकांना घेऊन उत्तरपत्रिका तपासणीचे काम रेटले जात आहे. या शिक्षकांना वरिष्ठ प्राध्यापकांचे मार्गदर्शन नाही. बऱ्याच उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांवर मॉडरेशन होत नसल्याचा आरोप बुक्टूच्या सरचिटणीस मधू परांजपे यांनी केला.
मॉडेल उत्तरपत्रिकेत चूक
टीवायबीकॉमच्या ‘मार्केटिंग अ‍ॅण्ड ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट’ या विषयाच्या मॉडेल उत्तरपत्रिकेमध्येच चूक आढळून आल्याने दोन दिवसात तपासणी झालेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी नव्याने करावी लागणार आहे. सात गुणांच्या एका प्रश्नाचे उत्तर मॉडेल उत्तरपत्रिकेत चुकीचे देण्यात आले होते. काही शिक्षकांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर ती दुरूस्त करण्यात आली. परंतु, चूक लक्षात येईपर्यंत काही उत्तरपत्रिका संबधित मॉडेल उत्तरपत्रिकेच्या सहाय्याने तपासण्यात आल्या होत्या. खरेतर ही चूक अत्यंत किरकोळ असल्याने पेपर तपासताना कोणत्याही वरिष्ठ प्राध्यापकाच्या निदर्शनास येऊ शकते.
मात्र, उत्तरपत्रिका तपासणीचे काम अननुभवी शिक्षकांच्या मदतीने करण्यात येत असल्याने किती परीक्षकांनी ती चूक दुरूस्त करून घेऊन उत्तरपत्रिका तपासल्या असतील अशी शंका आहे. त्यामुळे, पुनर्तपासणीशिवाय पर्याय नाही. कुलगुरू आणि परीक्षा नियंत्रकांना पत्र लिहून बुक्टूने या प्रकाराची तक्रार केली आहे.