कोल्हापुरात पुरामुळे मिरवणुकीत साधेपणा

कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी या ठिकाणी उद्या, गुरुवारी गणेश विसर्जन होणार असून मंडळ, तालीम यांनी विसर्जनाची तयारी सुरू केली आहे. पूरस्थितीमुळे विसर्जन मिरवणूक साधेपणाने काढण्यावर भर देण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  नये, यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमला असून ४ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवकांना बंदोबस्तासाठी नेमले आहे.

कोल्हापूर तसेच इचलकरंजी मध्ये नदीला आलेले पुराचे पाणी पात्राबाहेर आहे. मूर्ती विसर्जनासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे १२ फुटांपासून पुढे उंच गणेशमूर्तीचे विसर्जन क्रशर चौकातील इराणी खणीत करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.

दरवर्षी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पारंपरिक पद्धतीने पंचगंगा नदीत गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी चार हजारांवर पोलिस तैनात केले आहेत. ५५० विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ते पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार आहेत.

पंचगंगा नदीला आलेल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळीची इशारा पातळी ३९ फुटांवर स्थिर आहे. त्यामुळे नदीवर मोठय़ा मूर्तीचे विसर्जन त्रासदायक व धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे १२ फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीवर शक्य आहे. त्यापुढील उंच मूर्तीसह एकवीस फुटी मूर्तीचे विसर्जन कोल्हापूर-राधानगरी रोडवरील इराणी खाणीत करावे. इचलकरंजी शहरातही नदीची पाणीपातळी कायम आहे. त्यामुळे येथील मंडळांनी परिसरातील खणीत विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण विसर्जन मार्गावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. मिरवणुकीत सहभागी होणारी मंडळे, त्यांच्या मूर्ती, मिरवणुकीत आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. संशयास्पद व्यक्ती, वस्तू, वाहन मिरवणुकीतून तातडीने बाजूला काढले जाणार आहे. विसर्जन मार्गावर २०० सीसीटीव्ही बसविले आहेत. सायबर चौकापासून ते पंचगंगा नदी, इराणी खण यांसह प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. महापालिकेने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरही पोलिसांचे लक्ष असेल.

हुल्लडबाजांवर कारवाई केली जाणार असून मिरवणूक रेंगाळण्यास कारणीभूत ठरणारे, विनाकारण वाद घालणाऱ्यांवर पहारा ठेवला जाणार आहे.  महिलांची छेडछाड करणाऱ्यांना रोखण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली जाणार आहेत. साध्या वेषातील पोलीस संपूर्ण मिरवणुकीत टेहाळणी करणार आहेत. प्रत्येक चौकात टेहाळणी बुरुज बांधले जात आहेत. दुर्बिणीतून पोलीस वॉच ठेवणार आहेत. मिरवणूक मार्गाची पोलिसांनी पाहणी केली आहे.