News Flash

अतिक्रमणविरोधी कारवाई इचलकरंजीत सुरूच

कायमस्वरूपी अतिक्रमण काढून टाकण्याची मोहीम

इचलकरंजी नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई सुरू असताना एक महिला चक्क गाडीच्या पुढे आडवी पडल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र पथकातील कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला बाजूला करून आपली कारवाई सुरूच ठेवली. तर जनता चौक ते गांधी कॅम्प कोपऱ्यापर्यंत दुकानासमोरील सिमेंटचे कट्टे जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे गत दोन दिवसांतून मुख्य रस्त्यावर केलेले कायमस्वरूपी अतिक्रमण काढून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख शिवाजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज तिसऱ्या दिवशीही ही मोहीम कायम राहिली. मध्यवर्ती बसस्थानक समोर विक्रेत्यांसाठी गाळे बांधून देण्यात आलेले आहेत. मात्र तरीही काही विक्रेते या दुकान गाळय़ासमोरच हातगाडे लावून व्यवसाय करीत होते. ते सर्व हातगाडे निर्मूलन पथकाने जप्त केले. त्यानंतर रेयॉन पेट्रोलपंपानजीक रस्त्यालगत असलेली साखरे नामक महिलेची चहाची टपरी हटविण्यास पथकातील कर्मचारी गेले. त्या वेळी सदर महिलेने पथकाला कारवाई करण्यास विरोध दर्शवत वाद घातला. अधिकाऱ्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता ती सरळ पालिकेच्या वाहनासमोर जाऊन आडवी पडली. या महिलेला पालिकेने गाळा दिलेला असून हा गाळा भाडय़ाने दिला असल्याचे समजते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला बाजूला करत टपरी जप्त केली.
त्यानंतर या पथकाने मध्यवर्ती जनता चौकात कारवाई करताना दुकानासमोर बांधलेल्या पायऱ्या, सिमेंटचे कट्टे तसेच रस्त्यावर आलेल्या टपऱ्या काढून टाकण्याबरोबर साहित्य जप्त केले. जनता चौक ते गांधी कॅम्प कोपऱ्यापर्यंत जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. या वेळी किरकोळ वादावादीचे प्रकारही घडले. पण कोणालाही न जुमानता अतिक्रमण काढून टाकण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 3:30 am

Web Title: anti infringement proceedings continue in ichalkaranji
टॅग : Kolhapur
Next Stories
1 रंकाळा तलावाच्या प्रदूषण मुक्ती प्रकल्पांची तपासणी होणार
2 फुटबॉल सामन्यांसाठी पोलिसांच्या यंदा अटी
3 कोल्हापूरमधील टोल अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Just Now!
X