महापालिका निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीबरोबरच थेट अर्ज स्वीकारण्याची तयारी निवडणूक विभागाने दर्शविल्यानंतर त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी शुक्रवारी दिसून आला असून प्रथमच विभागीय कार्यालयासमोर इच्छुकांच्या रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी १२५० नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून २३ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहे. पुढील आगामी दिवसांत अर्ज सादर करण्यासाठी आणखीनच गर्दी होण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने यंदा प्रथमच ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे ठरविले होते. मात्र, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक दोष निर्माण झाल्याने इच्छुकांची पाचावर धारण बसली होती. दुसऱ्या दिवशीपासून तांत्रिक दोष कमी झाले तरी काही अडचणी जाणवतच राहिल्या होत्या. परिणामी, इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्याकडे पाठ फिरवली. पहिल्या तीन दिवसांत केवळ एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. अर्ज सादर करण्यातील कटू वास्तव लक्षात आल्यावर निवडणूक विभागाचे डोळे उघडले. या विभागाने गुरुवारी प्रत्यक्षात अर्ज स्वीकारण्यात येतील असे घोषित केले. त्याचा परिणाम आज लगेचच दिसून आला.
शुक्रवारी सर्व सातही विभागीय केंद्रांमध्ये इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्यांदाच उमेदवार रांगा लावून उभे असल्याचे चित्र दिसल्याने निवडणुकीचे वातावरण जाणवू लागले. शुक्रवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी महापौर नंदकुमार वळंजू, ईश्वर परमार, दिपाली ढोणुक्षे, तेजस्विनी रविकिरण इंगवले आदी प्रमुखांचा समावेश होता. उर्वरित तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी आणखी गर्दी होणार असल्याचे संकेत यातून मिळाले. अर्ज घेण्यासाठीही झुंबड उडाली होती. हजारांहून अधिक अर्जाची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.