दयानंद लिपारे

कोल्हापूर जिल्ह्य़ात भाजपने कधीच बाळसे धरले नाही. सत्ताकाळात चंद्रकांत पाटील यांच्यामुळे जिल्ह्य़ात पक्षाला बरे दिवस आले. सत्ता असल्याने हौशे, नवशे, गवशे सारेच पक्षात दाखल झाले. या साऱ्यांना पक्षात महत्त्व मिळत गेले, पण त्याच वेळी जुन्याजाणत्या व निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी झाली. संधी येताच या जुन्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य केले.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पराभवानंतर कोल्हापूर जिल्ह्य़ातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून टीकेचा मारा होऊ लागला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या पराभवास आमदार पाटील हे जबाबदार आहेत. जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनीही पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क ठेवला नसल्याने तेही दोषी आहेत, असा घरचा आहेर जिल्ह्य़ातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामागे पक्षांतर्गत सुप्त संघर्ष कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

कोल्हापूर जिल्ह्य़ांत गेल्या पाच वर्षांत भाजपचे महत्त्व वाढले  होते. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूलसारखे दुसऱ्या क्रमांकाचे खाते आणि प्रदेशाध्यक्षपदही आल्यामुळे भाजपच्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोल्हापूरमध्ये स्थिरावला. भाजपने पाच वर्षांंमध्ये छत्रपती घराण्यातील संभाजीराजे, समरजीत घाटगे, महाडिक परिवार यांच्यासह तालुका पातळीवरील अनेक डझनभर पुढारी यांना भाजपात सामावून घेतले. जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला. दादांचा राजकीय प्रगती महिमा निर्विवादपणे सुरू असतानाच त्यांच्या संघटनकौशल्याचीही वाहवा झाली. प्रगतीच्या अंतरंगात काही वेगळेच दडले होते. याचा प्रत्यय हल्ली दिसत आहे.

यशोपताका फाटकात असताना स्तुतिगान गाणारे सत्ता सरली की टीकाकार कसे बनतात हेच भाजपात दिसत आहे.

नाराजीच्या पडद्याआड

पाच वर्षांत भाजपाची जिल्ह्य़ात प्रगती झाली. पण सत्तेत मानाची पदे दिली त्यांच्याकडून पक्षकार्य नेमके काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांना खासदारकी, समरजीत घाटगे यांना म्हाडा पुणे अध्यक्ष, विधानसभेची उमेदवारी, तेथे पराभव झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष, हिंदुराव शेळके यांना यंत्रमाग महामंडळ व जिल्हाध्यक्ष, अमल महाडिक यांना आमदारकी तर त्यांच्या पत्नी शौमिका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पक्ष प्रवेश करताच प्रदेश उपाध्यक्ष, सुरेश हाळवणकर यांचा विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि प्रकाश आवाडे यांचा विजय झाल्यावर भाजपला पाठिंबा देणे; आता आवाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची चर्चा.. याकडे हे लक्ष वेधतात.

आयारामांना मानसन्मान दिला जात असताना जनसंघापासून भाजपची उभारणी करणाऱ्यांना डावलण्यात आल्याचा राग आता उफाळून आला आहे. पदवीधर मतदारसंघाचा निकाल जिव्हारी लागल्याने भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.  चंद्रकांत पाटील यांचे राज्य पातळीवरूनच पंख कापले जात आहेत का? या मुद्दय़ाचीही तेलवात पेटली आहे. सकल मराठा समाजाच्या मुंबईतील आंदोलनाला भेट देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशीष शेलार यांना सोबत घेऊन नव्या मराठा चेहऱ्याचे दर्शन घडवले. त्यांनी प्रदेश अध्यक्ष पाटील यांना डावलले जात असल्याचा तर्क आहे. भगवंत कुलकर्णी, नाना शिंदे या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांंनी समाज माध्यमातून चंद्रकांतदादांचे वाभाडे काढले आहेत.  एकाच वेळी तीन ठिकाणाहून पाटील यांच्याविरोधातील घडामोडी घडल्याने यामागे समान राजकीय सूत्र/ सूत्रधार आहे का, यावरही चर्चेचा कल्लोळ आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांंना पक्षाच्या उपक्रमांमध्ये सांभाळून घेतले जाईल, असे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी सांगितले. माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘पदवीधर निवडणुकीचे निमित्त करून पक्षांमध्ये फारसे महत्त्वाचे स्थान नसलेल्यांनी राजीनामा मागणे हा हास्यास्पद प्रकार आहे.’