कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठात समावेश असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मीचे नवरात्रोत्सवानिमित्त दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात राज्यभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यावर्षी आल्हाददायक वातावरण असल्याने दसऱ्यापर्यंत भक्तजनांची गर्दी आणखी वाढत जाण्याची चिन्हे आहेत. पहाटे चार वाजल्यापासून महिला, भाविक दर्शन रांगेत ठाण मांडताना दिसत आहेत. उद्या गुरुवारी ललिता पंचमी असून त्र्यंबोली यात्रा होणार आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी गर्दी होत असते. यंदाही हे चित्र कायम आहे. यंदा अद्याप ‘ऑक्टोबर हीट’ मुळे होणारा कडक उन्हाचा त्रास जाणवत नाही. मधूनच पावसाची हलकीशी सर येत असल्याने वातावरण आल्हाददायक आहे. त्यामुळे भाविकांचा ओढा आणखीनच वाढला आहे. मंदिराचे आवार पहाटेपासून गर्दीने ओसंडून वाहात आहे.

देवीच्या दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र, गोवा आदी राज्यांसह मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आदी ठिकाणचे भाविक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच मार्गावर वाहतूक कोंडी जाणवत आहे. भाविकांसाठीची वाहनतळाची  ठिकाणेही वाहनांच्या गर्दीने फुलली होती. दर्शनरांगेतील भाविकांना पाणी, सरबत वाटप सुरु होते. गर्दीमुळे होणाऱ्या उकाडय़ाचा त्रास जाणवू नये यासाठी दर्शन रांगेत जागोजागी पंखे सुरु केले आहेत.

भक्त मंडळातर्फे महाप्रसाद

शिवाजी पेठेतील अंबाबाई भक्त मंडळातर्फे परगावच्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मंडळाच्या हिंदुस्थान बेकरीशेजारील सभागृहात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून हा उपक्रम सुरु आहे. परगावच्या भाविकांबरोबरच बंदोबस्तावर असलेले पोलिस, होमगार्ड, सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवकांसाठी नऊ दिवस हा उपRम राबवला जाणार असल्याचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी सांगितले.

के.एम.टी.ची विशेष सेवा

गुरुवारी ललित पंचमी आहे. महालक्ष्मी देवी रुसलेल्या त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी शहराच्या पश्चिमेला असलेल्या त्र्यंबोलीच्या भेटीला लवाजम्यासह जाते. भेटीनंतर कोहळा फोडण्याचा सोहळा पार पडतो. त्र्यंबोली यात्रेनिमित्त हा परिसर सजला असून सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. केएमटी उपक्रमाअंतर्गत श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर यांच्यामार्फत बिंदू चौक येथून पहाटे ५ वाजल्यापासून यात्रा संपेपर्यत विशेष बस सेवा पुरवण्यात आली आहे.

पोलिसांचा खडा पहारा

सुरक्षेच्यादृष्टीने महालक्ष्मी मंदिर  तितकेच संवेदनशील मानले जाते. यासाठी मंदिराच्या सभोवती सुरक्षा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा पहारा अहोरात्र सुरु आहे.