आयुष्याची गाठ मजबूत असली की सरणावरुनही परत येता येतं. त्याचा जिता जागता प्रत्यय शुक्रवारी करवीरनगरीत आला. मृत झालेली वृध्दा जिवंत झाल्याने अंत्यविधीसाठी गेलेल्या नातेवाइकांची एकच गडबड उडाली.
याबाबतची हकीकत अशी, कुडीत्रे (ता. करवीर) येथील वनिता पांडुरंग भास्कर ही महिला काल दुचाकीवरुन मुलासोबत राजापूर येथे जात होती. प्रवास करीत असताना रस्त्यावरील गतिरोधकावरुन दुचाकी जात असताना त्या तोल जाऊन खाली पडल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्याने नातेवाइकांनी वृध्देला घरी नेले. अखेरची घटिका समजून नातेवाइकांनी वृध्देला पाहण्यासाठी गर्दी केली. काही काळानंतर त्यांच्या हालचाली पूर्णत बंद झाल्या. त्यावरुन नातेवाइकांनी त्या मृत झाल्याचा तर्क बांधला. लगोलग अंत्यसंस्काराची गडबड सुरु झाली. अंत्यविधीसाठी नातेवाईक स्मशानभूमीत आले, पण याचवेळी वृध्देची हालचाल सुरु झाली आणि नातेवाइकांची एकच तारांबळ उडाली.