पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील घोटाळ्यासंदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण पथकाच्या विशेष पथकाद्वारे चौकशीस प्रारंभ केल्यापासून आतापर्यंत समितीमधील किती दोषी पदाधिकारी, सदस्य आणि शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी कारवाई करण्यात आली असल्यास त्याची माहिती भाविकांसमोर उघड करावी, अशी मागणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन केली. या वेळी पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात येईल, तसेच या प्रकरणी त्यांच्याशी चर्चाही करण्यात येईल, असे आश्वासन कृती समितीला दिले.  निवेदन देतांना कृती समितीचे प्रवक्ता  सुनील घनवट, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते अरविंद पानसरे, सचिन वैद्य उपस्थित होते.
सहकारमंत्र्यांशी झालेल्या चच्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३हजार६७ मंदिरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाच्या वतीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या घोटाळ्यांचे सर्व पुरावे हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी चालू होते ना होते, तोच ती का थांबवण्यात आलेली आहे. तरी या प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ केल्यानंतर घोटाळ्याच्या कोणत्या गोष्टी उजेडात आल्या? घोटाळ्याची चौकशी कधीपर्यंत पूर्ण होणार आहे आणि हा चौकशी अहवाल शासनाला कधीपर्यंत प्राप्त होणार आहे, याची विचारणा केली. तसेच वरील सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता असावी आणि या अन्वेषणाची कालमर्यादा निश्चित करून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणीही पालकमंत्र्यांकडे समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
 देवस्थान  घोटाळा : गृहखात्याशी चर्चा – खडसे  
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील घोटाळ्यासंदर्भातील निवेदन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिले. खडसे यांनी  महाराष्ट्र देवस्थान समितीमधील घोटाळा प्रकरणाची गृहखात्याच्या वतीने चौकशी चालू आहे. या प्रकरणी गृहखात्याशी चर्चा करून या प्रकणात लक्ष घातले जाईल असे आश्वासन दिले.