यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक आणि डॉल्बीमुक्त साजरा करण्यात कोल्हापूरातील सर्व गणेश मंडळानी पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. डॉल्बी आरोग्यास घातक असून डॉल्बीमुक्त गणपती विसर्जन मिरवणूक काढून कोल्हापुरची जनता महाराष्ट्रात इतिहास घडवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापूरच्या पहिला मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर कोल्हापूरातील गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, श्री तुकाराम माळी तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.

फुलांनी सजविलेल्या आकर्षक पालखीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पुजन झाल्यानंतर पोलीस बँडसह श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकांनी परिसर दणाणून गेला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांनी मिरजकर तिकटीपर्यंत पालखी आणली. पालखी सोहळ्याची मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडणारी अशीच होती. गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मिरवणुकीचा जल्लोष दिसत होता. ढोल आणि ताशा पथकाचे सुत्रबध्द वाद्य तसेच मंडळांची केलेली विद्युत रोषणाई हे विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण होते.

यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्यावतीने कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गावरील ‘अंबाबाई एक्स्प्रेस’ हा देखावा नागरीकांचे आणि भाविकांचे मुख्य आकर्षण ठरला. या मिरवणुकीत श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकामध्ये पाटील यांनी सहभाग घेऊन ढोल वाजवून ताल धरला. यावेळी उपस्थितांनी त्यांना उत्स्फुर्तपणे दाद दिली.

यावेळी पाटील म्हणाले, कोल्हापूर आणि कोकण रेल्वेला जोडण्याऱ्या रेल्वे कामाला गती आली असून या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध झाला असून येत्या एक दोन महिन्यांत याचे काम सुरु होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.