महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दुसरी यादी जाहीर केली असून, त्यामध्ये घराणेशाहीचा वरचष्मा जाणवत आहे. भाजपने उमेदवारी नाकारलेले माजी जिल्हाध्यक्ष नाना जरग यांना उमेदवारी देत बेरजेचे राजकारण केले आहे. उमेदवारी निश्चिती करताना पक्षांतर्गत वादाची किनार लागली. माजी आमदार मालोजीराजे समर्थक समीर घोरपडे आणि मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्या सून नीलोफर यांना पक्षांतर्गत गटबाजीतून उमेदवारी डावलली गेली आहे.
काँग्रेस पक्षाने पहिली यादी अवघ्या १८ उमेदवारांची जाहीर केल्याने दुस-या यादीकडे काँग्रेस पक्षासह इतर पक्षांच्याही नजरा लागल्या होत्या. मुंबईमध्ये पक्षश्रेष्ठींसोबत चार तासांची खलबते पार पाडल्यानंतर यादी जाहीर झाली असून त्यामध्ये विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक यांच्या निकटच्या नातेवाइकांचा भरणा झाला आहे. काँग्रेसचा तळातील कार्यकर्ता उपेक्षित राहिला असल्याचेही दिसत आहे.
माजी सभागृह नेता श्रीकांत बनछोडे, माजी महापौर जयश्री सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती इंद्रजित सलगर, अशोक जाधव, दिलीप पोवार, नंदकुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी मिळाली आहे. नगरसेवकांच्या घरातील सदस्यांनाही उमेदवारी देण्यात आली असून, त्यामध्ये इंद्रजित बोंद्रे यांच्या मातोश्री शोभा पंडितराव बोंद्रे, माजी परिवहन सभापती शिवाजी डोंगळे यांच्या पत्नी शोभा डोंगळे, नगरसेवक मधुकर रामाणे यांची सून अश्विनी अमर रामाणे, माजी नगरसेवक तुकाराम तेरदाळकर यांच्या पत्नी सुनंदा तेरदाळकर यांचा समावेश आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नाना जरग यांनी भावाच्या सुनेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. ती नाकारण्यात आल्यानंतर जरग कुटुंबीय काँग्रेसच्या संपर्कात आले असून, पक्षाने वैभवी संजय जरग या नाना जरग यांच्या नातसूनेला उमेदवारी दिली आहे.