शेतकरी संपाचे लोण कोल्हापूर जिल्ह्यात वाढण्याचे संकेत शनिवारी शेतकरी संघटनांनी येथे दिले. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतीमाल फेकून दिला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरोधात घोषणा दिल्या. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी आमची संघटना दोन दिवसांत सक्रिय होणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या संपावरील शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा झाली. या बठकीतील निर्णय मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने आज येथे सांगितले. या निर्णयाविरोधात उभे राहण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

शासनाच्या शेती धोरणाचा निषेध करण्यासाठी रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, अजित पाटील, आदम मुजावर, मकरंद कुलकर्णी, गुणाजी शेलार यांच्यासह कार्यकत्रे आज जिल्हाधिकाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने शेतीमाल देणार होते. त्यासाठी त्यांनी भाजीपाला भरून आणला होता. मात्र पोलिसांनी त्यांना आत प्रवेश करण्यापासून रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजीपाला प्रवेशद्वारात फेकून दिला. शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार

या आंदोलनाला बाहेरून पाठिंबा देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत आज देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी आमची संघटना दोन दिवसांत सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केले. संघटनेचे नेते राजू शेट्टी हे शेतकरी व संघटना यांना एकत्रित करून लढ्याची भूमिका मांडतील असेही ते म्हणाले. कोल्हापूर बाजार समितीचे संचालक असलेले काटे यांनी आज बाजारात आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे सांगितले. सद्य:स्थितीत धोका पत्करण्याची मानसिकता शेतकऱ्याची नसल्याने आवक घटल्याचे त्यांनी सांगितले.