कोल्हापूर : कोल्हापूरात पहिली विमानसेवा उपलब्ध करून देणारे छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव विमानतळाला देण्यास राज्य शासनाने बुधवारी मान्यता दिली. त्यानंतर भाजपातर्फे व्हिनस कॉर्नर येथे असलेल्या छत्रपती राजाराम महाराज पुतळ्याजवळ साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजराम महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दीर्घकाळापासून लढा सुरु आहे. त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. ऑगष्ट २०१५ मध्ये भर पावसात उदयसिंहराजे यादव यांच्यासह सहकार्यांनी धरणे आंदोलन केले होते. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, श्रीकांत घाटगे यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य ती पावले उचलू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. तसेच वकील बाबा इंदुलकर , चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अतुल गांधी यांनी शासनांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन राज्य मंत्रिमंडळाने आज हा निर्णय घेतला.

भाजपाच्यावतीने साखर,पेढे वाटप
भाजप महानगरच्यावतीने आज या निर्णयाचे स्वागत म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महेश जाधव म्हणाले, या मागणीवर आज महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाईल आणि त्यावर या प्रस्तावास मान्यता मिळेल.

खासदार महाडिक यांच्याकडून स्वागत
विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णयाचे मी स्वागत करत असून, राज्य सरकारचे आभार मानत आहे, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले. राजाराम महाराजांनी कोल्हापूरची विमानसेवा सुरु केली, त्यांचेच नाव विमानतळाला देण्याचा निर्णय म्हणजे कोल्हापूरच्या जनभावनेचा विजय आहे. त्यांच्या नावाच्या विमानतळावरुन नियमित आणि व्यापक विमानसेवा सुरु होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.