चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्याकडे जमा झालेल्या संपत्तीचा हिशेब द्यावा. त्यांच्याकडे इतका पैसा कसा आला याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली.

कोल्हापूर जिल्हा महानगर भाजप कार्यकर्त्यांंच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये पाटील बोलत होते.  यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या विधानावर टीका करीत त्यांची आर्थिक प्रगती कशी झाली यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, एकेकाळी दुचाकीवरून फिरणाऱ्या मुश्रीफ यांची खासगी साखर कारखाना उभारण्याची आर्थिक स्थिती होती का? त्यांच्या कारखान्यात कोणाचे पैसे गुंतले आहेत, त्यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला, त्याची माहिती उघड व्हावी.

सतेज पाटील यांच्याकडे पंचतारांकित हॉटेल उभे करण्यासाठी आर्थिक ताकद कोठून आली? कोल्हापूर शहराची काळमवाडी नळपाणी योजना पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक लढवणार नाही असे म्हणाले आणि विधानसभेला उभे राहून पराभूत झाले. विधान परिषद सदस्य यांना मंत्री करायचे नाही असे धोरण असताना यांनी पैसे ओतून मंत्रिपद मिळवले आहे. मीही मंत्री होतो ,पण पाच इंच जमीनही मिळवली नाही. या दोघांनी आमच्या घरातून आमचा भाऊ  चोरून नेला, त्याला आमिष दाखवले,असे म्हणत पाटील यांनी शिवसेनेला जिल्हा परिषद सत्तेत नेण्यावरून टीका केली.

उपकाराचा विसर

नव्या मंत्र्यांनी आमच्यावर टीका करू नये. रात्री नंतर दिवस उगवतो हे ध्यान्यात असू द्या. आमची सत्ता येईल तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा शिल्लक असणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती अशा सर्व निवडणुका भाजप ताकदीने लढून यश मिळवेल, असा दावा पाटील यांनी केला. आमची सत्ता गेल्यावर अनेकांना उपकाराचा विसर पडला आहे. मात्र आजही धनंजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे यांनी भक्कम साथ दिली आहे, असेही पाटील  यांनी नमूद केले.