राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यात ऊसाच्या वजनामध्ये काटा मार होत असल्याचे वक्तव्य माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सोमवारी केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. महाडिक यांच्या ताब्यातील गोकूळ दूध संघावर अलिकडे अन्य विरोधकांच्या बरोबरीने मुश्रीफ यांनीही आवाज उठवण्यास सुरुवात केली असताना आता महाडिक यांनी त्यांच्या साखर कारखान्याला लक्ष्य केल्याने याचे कोणते राजकीय पडसाद उमटतात याकडे लक्ष लागले आहे.

कोल्हापूरचे उपनगर असलेल्या कसबा बावडा येथे राजाराम सहकारी साखर कारखाना आहे. या साखर कारखान्यावर महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. कारखान्याच्या कारभाराला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून नेहमी आव्हान दिले जाते. या साखर कारखान्यांनी सन २०१८-१९ या गळीत हंगामात वर्षाचे प्रतिटन २०७ रुपये अद्याप दिलेले नाहीत. ही रक्कम मिळावी याकरिता ऊस उत्पादक शेतकरी पंधरा दिवसापूर्वी व्यवस्थापनाला भेटले होते. तेव्हा काही तरी मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आज पुन्हा शेतकरी राजाराम कारखान्यात गेले. तेथे त्यांनी महाडिक यांच्याकडे देय रक्कम मिळण्याची मागणी केली. त्यावर महाडिक यांनी साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत असल्याने पैसे देता येणार नाहीत, असे सांगितले.

त्यावर काही शेतकऱ्यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्याने एफआरपीशिवाय आणखी शंभर रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यातील पन्नास रुपये गणेश उत्सव काळात मिळणार आहेत, याकडे महाडिक यांचे लक्ष वेधले. त्यावर महाडिक यांचा चांगलाच पारा चढला. त्यांनी घोरपडे कारखान्याच्या वजन काटा चोख नसल्याचा आरोप केला. त्यावर शेतकऱ्यांनी ‘तुमच्या तरी कारखान्याचा काटा कुठे चोख आहे’ असे प्रत्युत्तर दिले.

हा शाब्दिक वाद वाढत गेला. मात्र, ऊस उत्पादक शेतकरी आणि राजाराम कारखाना यांच्यातील रकमेचा वाद असताना महाडिक यांनी त्यामध्ये ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांच्या सरसेनापती घोरपडे या खाजगी कारखान्याला ओढून तेथील वजन काट्यामध्ये काळेबेरे होत असल्याचा आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुश्रीफ यांनी महाडिक यांच्या गोकुळ दूध संघवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून महाडिक यांनी हा वार केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

यापूर्वीही लोकसभा निवडणूक वेळी महाडिक यांनी खुपिरे गावात झालेल्या एका बैठकीवेळी ‘गोकुळ कारखाना वाचायचा असेल तर धनंजय महाडिक यांना निवडून आले पाहिजे’ असे विधान केले होते. ते विधान वादग्रस्त ठरले होते. आताही गोकूळची निवडणूक तोंडावर आली असताना महाडिक यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर मुश्रीफ हे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.