कोल्हापुरातील मटण वादावर अखेर तोडगा निघाला आहे. शिवाजी पेठेत मंडळ आणि मटण विक्रेते यांच्यात पार पडलेल्या बैठकीत मटण वादावर तोडगा काढण्यात आला. यै बैठकीत मटण ४८० रुपये किलोने विक्री करण्यावर एकमत झाले. ४५० रुपये किलोच्या घरात असणारा मटणाचा दर ६०० रुपये झाल्याने जिल्ह्यातील नागरिक भडकले होते आणि थेट आंदोलनच पुकारलं होतं. अखेर मटण दरासाठी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्यांनी अहवाल सादर करावा असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला होता. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या दर समितीच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीआधीच तोडगा निघाल्याने नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकला आहे.

काय आहे प्रकरण:
कसबा बावडा या उपनगरात या मुद्दावरून पहिली ठिणगी पडली. पंचगंगा नदीपलीकडे ४५० रुपये किलो दराने मटण विक्री सुरु असल्याचे सांगत बावडेकरांनी गावातील मटण विक्रेत्यांना त्याच दरात मटण विक्री करा, अन्यथा पर्यायी मटण विक्रेत्यांना पाचारण करून तुमच्यावर बहिष्कार टाकू’ असा इशारा दिला. पाठोपाठ कोल्हापूर शहराच्या भागाभागात तापत चालले. ग्रामीण भागात आंदोलनचे लोण पोहोचले. अनेक गावात मटण विक्री रोखण्यात आली.

आंदोलनाने शहरातील पेठापेठांमध्ये तालमीतल्या पोरांनी दंड थोपडले, लोकही त्यांच्या मागे नारे देत जमले. काही मंडळांनी ४५० रुपये किलोप्रमाणे मटण विक्री सुरु करून महाग दराने विक्री करणारया विक्रेत्यांना धडा शिकवला. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा होऊ लागल्याने मटण विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घ्यावी लागली. अखेर मटण दरासाठी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्यांनी अहवाल सादर करावा असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना द्यावा लागला.

संयुक्त समितीचा उतारा
२८० रुपये किलो दराने मिश्र मटण (चरबीसह) व विनामिश्र मटन ४५० रुपये किलोने विक्री व्हावी, अशी मागणी कृती समितीने केली होती. तर, मटण विक्रेत्यांनी प्रतिकिलो ५६० रुपयांऐवजी ५४० रुपयाने विक्री करू, अशी तयारी दर्शवली होती. याप्रश्नी बारा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीत नागरी कृती समिती आणि मटण विक्रेते संघटनेचे प्रत्येकी पाच सदस्य होते. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, अन्न, औषध प्रश्न अधिकारी समिती नेमली होती.

बकरी महाग झाल्याने मटण सुद्धा जादा दराने विकणे भाग – मटण विक्रेते
मटण विक्रेते मात्र बकरी महाग झाल्याने मटण सुद्धा जादा दराने विकणे भाग असल्याचे सांगत होते. दुष्काळ आणि त्यानंतरचा महापूर, परतीचा पाऊस यामुळे बकऱ्यांची पैदास घटल्याने बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत बकऱ्यांचा पुरवठा कमी पडू लागल्याने मटणाच्या दरात वाढ होत आहे. गोवा, आंध्र प्रदेश , केरळ राज्यात ६५० ते ७०० रुपये किलो प्रमाणे मटण विक्री होत आहे. बकरे, बोकड याच्या चामडय़ाचे कारखाने बंद झाले झाल्याने भाववाढीला आणखी एक कारण आहे. कारण पूर्वी चामडय़ाला ३०० रुपये मिळायचे. आता दहा/वीस रुपये मिळण्याची मारामार झाल्याचे विक्रेते सांगत होते.