तीन आठवड्यांनंतर आलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार कायम आहे. पावसाचा वेग वाढला असून रातोरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये दहा फूटांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ७१ बंधारे पाण्याखाली गेले असून सहा मार्ग बंद आहेत.

पावसाअभावी कोल्हापूर जिल्ह्यातील पिके धोक्यात आली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्व नदी, धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे.
काल रात्री आठ वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा नदीची पाणीपातळी २१ फूट होती तर बुधवारी सकाळी ती ३२ फूट झाली होती. रातोरात दहा फुटातून अधिक पाणी पातळी वाढली असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. काल सायंकाळी काल सकाळी जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली होते तर आज सकाळी प्राप्त झालेला अहवालानुसार ७१ बंधारे पाण्याखाली आहेत. काल तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद होते आज ही संख्या सहापर्यंत पोहोचली आहे.

पश्चिम घाटात पावसाचा वेग तुफानी झाला आहे. गगनबावड्यात तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडत आहे. काल तेथे १३७ मिलिमीटर पाऊस झाला होता तर आज सकाळी प्राप्त झालेला अहवालानुसार ३१७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.