भाजपच्या आमदारांबाबत सेनेचा आक्षेप, तर काँग्रेसचे आमदारही विरोधी गटात

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटण्याआधी कोल्हापुरात राष्ट्रवादी-काँग्रेस आणि शिवसेना-भाजप यांच्यात संघर्षांला तोंड फुटले आहे. शिवसेनेने भाजपचे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षासह ५० जण राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरल्याचे जाहीरपणे तक्रार केली असून त्यांना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात आणावे, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे चुलतभाऊ  आमदार अमल महाडिक, त्यांची पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक हे युतीधर्म पालन करणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे, तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याने आघाडी धर्माला तडा गेला आहे. आमदार पाटील यांना उभय काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून परावृत्त करणे कठीण असल्याचे दिसत आहे.

मंगळवारी  शिवसेनेचे कोल्हापूर संपर्क नेते दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. या वेळी संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी युतीधर्माच्या पालनावर जोरदार आक्षेप घेतला.

चहा, पत्नी आणि पालकमंत्री

गेल्या आठवडय़ात शिवसेनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांनी प्रचारात निष्ठा कितपत हवी याचे उदाहरण देताना एक खुमासदार उदाहरण दिले होते. ‘माझी पत्नी जरी विरोधात निवडणुकीला उभी राहिली, तरी सकाळी आम्ही दोघे एकत्रित चहा – घेऊ; पण प्रचार मात्र पक्षाचाच करू’ असे विधान करून त्यांनी धनंजय महाडिक यांच्याशी मैत्री असली तरी पक्षादेश महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट केले. त्यांचा हा इशारा महाडिक दाम्पत्यांना उद्देशून होता, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. घर-नातेसंबंध एकीकडे आणि पक्षाचे काम एकीकडे असे समजून पक्षादेशाकडे पाहावे, असा छुपा इशारा त्यांच्या वक्तव्यात होता, असा निष्कर्ष नोंदवला जात आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांची भूमिका युतीधर्माच्या बाबतीत निर्णायक ठरणार आहे.

आघाडीधर्म धोक्यात

युतीतील कलहाचे पडसाद उमटू लागले असताना इकडे आघाडीच्या तंबूतही वादाने डोके वर काढले आहे. शिवसेनेचे उमेदवार मंडलिक यांना गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे. त्याला मध्यंतरी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचीही साथ होती; पण आता मुश्रीफ यांनी महाडिक यांची नौका पुन्हा पैलतीराला लावण्याचा चंग बांधला आहे. मात्र आमदार पाटील यांनी अगदी चार दिवसांपूर्वीही मंडलिक यांना पाठबळ दिले आहे, तर त्यांचे पुतणे, कोल्हापूर विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार ऋतुराज पाटील यांनी तर मंडलिक यांचा थेट प्रचार केला आहे. एकूणच पाटील यांना मानणारा गट हाती शिवधनुष्य घेणार हे उघड आहे. यामुळे आघाडीधर्माला तडा जात आहे. याबाबत आमदार मुश्रीफ यांनी तर ‘जे घडत आहे ते उघड आहे, याबाबत वरिष्ठच काय तो निर्णय घेतील’, असे म्हणत जिल्ह्य़ातील उभय काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मर्यादाही स्पष्ट केल्या आहेत.