अबकारीकराच्या विरोधात सराफ व्यावसायिकांनी शुक्रवारी अर्धा दिवस बंद पाळण्याच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतेक दुकाने आज उघडी होती. तथापि, आज कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर दंडवत घालणाऱ्या सराफ व्यावसायिकाला चक्क अंघोळ घातली. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने सोन्याच्या व्यवहारावर १ टक्का अकबारी कर लावण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाविरोधात गेल्या १० दिवसांपासून देशभरातील सराफ व्यवसाय बंद ठेवले आहेत. मात्र सरकारने अद्याप यावर निर्णय न घेतल्याने आता हे आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यावसायिकांनी केला आहे. आज जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामुळे कोल्हापूर शहरातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा मात्र कोलमडली होती.
दरम्यान, आज सराफ बंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अन्य व्यावसायिकांनी दुकाने अर्धा दिवस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व दुकाने नेहमी प्रमाणे उघडी होती. ग्राहकांची खरेदी सुरू होती. बंदचा मागमूस कोठेही जाणवला नाही.