राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली असतानाच कोल्हापूरमध्ये पक्षाच्या बडय़ा नेत्यांच्या पुढील पिढीने भाजपचा मार्ग पत्करल्याने पक्षाचा एकेकाळच्या बालेकिल्ल्याला घरघर लागल्याने मानले जाते. यामुळे नेत्यांच्या मुलांकडूनच पक्षाला आव्हान मिळाले आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तसचे माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने आणि आमदार संध्याताई कुपेकर यांची कन्या नंदा बाभुळकर यांनी भाजपबरोबर घरोबा करण्याचे जाहीर केले आहे.  कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षनेते शरद पवार यांनी कोल्हापूरवर कायम बारीक लक्ष ठेवले. पक्ष स्थापन झाल्यानंतर लोकसभेच्या दोन्ही जागांवर तसेच विधानसभेच्या निम्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार निवडून येत असतं. पक्ष वाढत चालला तस तसे अंतर्गत कुरघोडय़ाही सुरू झाल्या. मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी मुश्रिफ यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण केल्याने त्याचा फायदा झाला. संसद सदस्य महाडिक यांची संसदेतील कामगिरी प्रभावी राहिली तरी त्यांनी कोल्हापूर महापालिका तसेच अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत फारसे लक्ष घातले नव्हते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ते प्रथमच पक्षात सक्रिय झाले. तथापि, त्यांनी काका महादेवराव महाडिक व चुलत बंधू, भाजप आमदार अमल महाडिक यांच्या राजकारणाचा वेध घेत त्यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपसोबत युती करण्याचा विचार पक्ष निरीक्षक सांगलीचे दिलीप पाटील यांच्याकडे बोलून दाखविला. पण शरद पवार यांचा या आठवडय़ातील कोल्हापूर दौरा लक्षात घेऊन त्यांनी पूर्वीच्या भूमिकेपासून घुमजाव करत देत मुश्रिफ म्हणतील त्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक लढविल्या जातील असे स्पष्ट केले आहे. याच वेळी महाडिक यांनी मुश्रिफ यांच्या सोईच्या राजकारणावर तोफ डागली आहे. मुश्रिफ यांना त्यांच्या कागल तालुक्यातील राजकारणात शिवसेना कशी चालते असा सवाल त्यांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता माने यांचे पुत्र धर्यशील माने यांनी हातकणंगले तालुक्यात तर आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदा बाभुळकर यांनी चंदगड तालुक्यात भाजपसोबत आघाडी करून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची भूमिका थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत घोषित केली आहे. मुश्रिफ यांच्याकडून पक्षांतर्गत खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे माने व कुपेकर यांनी जाहीर केले.

पक्षाला सुरुंग, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीच्या शिरोळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी पक्षाचे युवा आघाडीचे एक अध्यक्ष भाजपवासी झाले. आणखीही काही प्रमुखांवर भाजपकडून जाळे फेकले गेले आहे. यामुळे भक्कम वाटणाऱ्या राष्ट्रवादीला सुरुंग लागला आहे. उमेदवार मुलाखतीवेळी पक्षनिरीक्षक दिलीप पाटील यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची मोकळीक राहील असे स्पष्ट केले होते. मात्ऱ, राष्ट्रवादीची नेमकी भूमिका कोणती यावरून इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.