24 September 2020

News Flash

कोल्हापुरात पाचव्या दिवशीही पाऊस सुरुच; शहराला जोडणारे अनेक रस्ते पाण्याखाली

शिये फाटा ते कसबा-बावडा रस्ता वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूरात : जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरु असल्याने पूरस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूर शहराशी जोडणारे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गांवरील वाहतुक बंद झाली आहे.

कोल्हापुरात सध्या पावसाचा कहर सुरु असून कोल्हापूर शहराशी जोडणारे अनेक रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने यावर नियंत्रणासाठी शहरात एनडीआरएफच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, केर्ली ते केर्ले दरम्यान स्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग काही काळ बंद झाला होता, मात्र पाणी ओसरु लागल्याने तो पुन्हा सुरु झाला आहे. तरी ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे-बंगळूरुन राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यासाठी शिये फाटा हा एक मार्ग आहे. तेथे कसबा बावडा ते शियेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अर्धा फूट पाणी आले आहे. त्यामुळे कसबा बावड्याकडे जाणारा रस्ता हनुमान नगर, शिये याठिकाणी वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा-दोनवडे येथे रस्त्यावर पाणी आले आहे. मात्र, तरीही या धोकादायक स्थितीत या मार्गावर वाहनधारक, लोकांची वर्दळ सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस पाऊस सुरू असून तुलनेने आज पावसाची गती काहीशी कमी झाली आहे. आज सकाळी थोडा वेळ सूर्यदर्शन झाले होते.

जिल्ह्यात आज पाचव्या दिवशीही पाऊस पडत असून कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यातील पाणी पातळीने आज सकाळी इशारा पातळी ओलांडली. पाणी धोका पातळीच्या दिशेने जात असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाची वाढती गती लक्षात घेऊन काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी महापुराचा धोका असलेल्या चिखली, आंबेवाडी गावात जाऊन ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याची सूचना केली. काही गावकऱ्यांनी काल दुपारपासूनच स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काही गावकऱ्यांत अजून गंभीर पूरस्थिती उद्भवली नाही असा सूर व्यक्त होता. यावर पोलीस प्रशासनाकडून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. आज जिल्हाधिकारी देसाई पुन्हा एकदा या गावांना भेटी देऊन लोकांना स्थलांतरित होण्याबाबत सूचना करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी

पंचगंगा नदीने आज सकाळी ३९ फूटांची इशारा पातळी ओलांडली. सकाळी सहा वाजता नदीची पाणीपातळी चाळीस फूट होती. तसेच आज सकाळी ९ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४१ फूट १० इंचावर पोहोचली. या बंधाऱ्याची धोका पातळी ४३ फुटांची आहे. दरम्यान, शहर आणि जिल्ह्यातील एकूण १०२ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत.

लोकप्रतिनिधी सतर्क

काल रात्रीपासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर यांनी मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासोबत शहरातील काही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, संभाव्य पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

काही प्रमाणात पाणी ओसरले

गगनबावडा-कोल्हापूर रस्त्यावरील पाणी कमी व्हायला सुरुवात झाली आहे. मांडुकली येथील पाणी रात्रीपासून २ फूट कमी झाले आहे. मलकापूर-आंबा रस्त्यावरील निळे येथील पाण्याची पातळी कमी आल्याने रत्नागिरी कोल्हापूर वाहतूक सुरळीत झालेली आहे. तसेच करंजफेण बाजार पेठेतील पाणीही ओसरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 11:01 am

Web Title: rain continues for fifth day in kolhapur many roads connecting the city are under water aau 85
टॅग Rain
Next Stories
1 करोनाच्या संकटात कोल्हापूरकरांची वर्षाविहाराची मौजमजा; ओसंडून वाहणाऱ्या कळंबा तलावावर गर्दी
2 कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत १० फुटांनी वाढ, पावसाचा जोर आणखी वाढला
3 कोल्हापूर : राम मंदिर भूमिपूजनानिमित्त करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिरही सजले
Just Now!
X