News Flash

राजू शेट्टी यांचा नवा घरोबा कोणाबरोबर ?

गेले वर्षभर कोंडलेल्या अवस्थतेला मोकळे करीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आता सत्तेतून विसावले आहेत . पण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी

गेले वर्षभर कोंडलेल्या अवस्थतेला मोकळे करीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आता सत्तेतून विसावले आहेत . पण , यापुढे त्यांच्यासमोर डोंगराएवढी आव्हानेही उभी ठाकली आहेत . सत्तावर्तुळाबाहेर पडून एकाकी झुंज देताना या बळीराजाच्या नेत्याला सत्तास्थानी अधिकाधिक बळकट होत चाललेल्या भाजपाशी  दोन हात करताना त्यांच्याकडून पदोपदी उभे केले जाणारे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे .  या पातळीवरचा संघर्ष गडद- गहिरा होत जातानाच आजवर ज्या सहकार- साखर सम्राटांशी उभा दावा कायम ठेवणार की   शिवसेनेशी  नवा घरोबा करीत नवे राजकीय शिवार फुलवणार, असे अनेक मुद्दे डोके वर काढत आहेत.

दोन दशकापूर्वी पश्चिम महारष्ट्रात काँग्रेसचा डंका वाजत असताना शेतकरी चळवळीची वाकडी वाट चालण्याचे धाडस राजू शेट्टी या अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने दाखवले .  ज्येष्ठ नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या लढय़ात उडी घेतली.  जोशी यांचा शिवसेना- भाजपकडे कल वाढल्याने धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा छेडत शेट्टी यांनी आपली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वेगळी छावणी उभारली . . ऊस उत्पादक शेतकरयांच्या प्रश्नावर सुरू केलेल्या स्वाभिमानी संघटनेची मुळे रुजू लागली असताना शेट्टी यांना सदाभाऊं खोत हा आणखी एक तगडा  तोफखाना मिळाला.  गेले तपभर पेटलेल्या  ऊस आंदोलनाचे राजकीय अपत्य म्हणजे राजू शेट्टी. जिल्हा परिषद ते  खासदार व्हाया विधानसभा असा राजकीय आलेख उंचावणारे राजू शेट्टी हे दूध- ऊस उत्पादक शेतकरयांच्या गळ्यातील ताईत  बनले . राम-लक्ष्मणाच्या जोडीतील  सदाभाऊ मंत्री बनून भाजपशी सत्तासंगत  करून बसले . त्यावरून रान पेटले आणि अलीकडे त्यांना स्वाभिमानीतून बाहेरचा रस्ता  दाखवण्यात आला .

सदाभाऊ पाठोपाठ  शेट्टी यांनाही केंद्रात मंत्रिपद देण्याची चर्चा ऐन  रंगात आली होती पण शेट्टी यांच्या मनातील राजरंग काही वेगळाच होता . सत्तेवर येताना भाजपने दिलेली आश्वासने पाळली नाहीत असा मुद्दा उपस्थित करत शेट्टी यांनी थेट मोदी पासून ते फडणवीस यांच्यावर तिखट भाषेत हल्ला चढवला . दुसरीकडे पक्ष वाढवण्यासाठी भाजपने शेट्टी यांच्या बालेकिल्ला शिरोळ येथे जिल्हा परिषद निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण सुरु केले . याचवेळी शेट्टी हे सत्तेला चटावले असून त्यांनी शेतकरयांना वारयावर सोडले अशी चौफेर टीका होऊ लागली .  त्यामुळे या राजकीय वादळात पाचोळ्याप्रमाणे वाहत जाण्याची वेळ शेट्टी यांच्यावर आली . त्यातून त्यांनी सहकारयांची मते आजमावून सत्तेतून बाहेर पडण्याचा धाडशी निर्णय घेतला आहे   , पण तो राजकीयदृष्टया यशस्वी ठरतो कि तो त्यांच्यावरच उलटतो यावर राजकीय पातळीवर महत्व प्राप्त झाले  आहे.

संसद की शिवार

शेतकर्याचे प्रश्न आक्रमक आंदोलनात्मक पातळीवर हाताळत शेट्टी यांनी शिवार ते संसद असा राजकीय प्रवास गाठला खरा . सत्तेची खुमारी काय असते हे चाखण्याची संधी असताना त्यांनी  राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे राजकीय भवितव्य काय हाच खरा प्रश्न उपस्थित झाला आहे .  शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरल्याचा आरोप गेले वर्षभर शेट्टी उच्चरवात करत आहेत .  याबाबतीतले केंद्र व राज्य शासनाचे  अपयश टोकदार पद्धतीने मांडणी करण्यास शेट्टींना आता अवघ्या देशाचे वावर मोकळे आहे .  पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे शेट्टी हे शेतकरयांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यात किती यशस्वी ठरतात त्यावर त्यांचा राजकीय प्रवास अवलंबून आहे . कर्जमाफी , हमी भाव , स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी , शेती मालाची आयात – निर्यात आदी मुद्दांवर  देशभरातील शेतकरयांत तीव्र नाराजी आहे . त्याला केवळ वाचा फोडून चालणार नाही तर ते सुटले पाहिजेत या दिशेने ढोस पावले पडली पाहिजेत . तरच शेतकरयांचा विश्वास वाढीस लागून शेट्टी यांची मतपेढी सुरक्षित राहणार आहे .

याचवेळी शासन शेतकरी हिताचे काही निर्णय घेत असताना त्याचे श्रेय आपल्या पदरात कसे पडेल आणि शेट्टी यांना त्यापासून कसे दूर ठेवता येईल याची खबरदारी अर्थातच घेणार हेही उघडच . त्यामुळे शिवारातील लढाईचा राजकीय जुगारशेट्टी यांना संसदेत जाण्यास साहाय्यभूत ठरणार की त्यांना शिवारातच रोखण्यास कारणीभूत ठरणार याचाही यानिमित्ताने फैसला अपेक्षित आहे .

भाजपचे लक्ष्य शेट्टीच

पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत बोचरी टीका करण्यात सध्या विरोधकांपेक्षा शेट्टी हेच चार पावले पुढे आहेत . सत्तेत पुन्हा येण्याची भाषा करणारया भाजपाला ते खचितच आवडणारे नाही . त्यामुळे सत्तेतील भाजप आपली सारी शक्ती पणाला लावून शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत नामोहरण करण्याच्या तयारीला आता उघडपणे लागणार .   भाजपची पश्चिकम महाराष्ट्राची धुरा वाहणारे चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही मार्गाने  भाजपचा विस्तार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून नेते-कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी आयात करण्याचा सपाटा  लावला आहे . आता त्याला आणखी बळ  येईल . मात्र शेट्टी यांच्या विरोधात शड्ड ठोकण्यासाठी कोणाला पुढे करायचे याचा निर्णयही भाजपाला तितक्याच विचारपूर्वक करावा लागणार आहे . आजच्या घडीला शेट्टींच्या दोषांची  खडानखडा  माहिती असणारे सदाभाऊ , माजी मंत्री विनय कोरे , भाजपात प्रवेश केले तर कल्लापाण्णा आवाडे – निवेदिता माने हे शेट्टी यांच्या विरोधात लढलेले माजी खासदार अशी काही नावे पुढे येत आहेत . तथापि काही झाले तरी शेट्टी यांची घोडदौड रोखण्याची शिकस्त भाजप करणार के नक्की असल्याने हातकणंगले लोकसभेचे रणांगण तापत जाणार  आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी की शिवसेना

भाजपशी एकाकी झुंज देणे सोपे नसल्याने शेट्टी यांना नवा राजकीय घरोबा करावा लागणार आहे . बारामती, कराड येथे मोठे आंदोलन करूनही शरद पवार यांनी शेट्टी यांची दखल घेताना खोत यांना अदखलपात्र ठरवले असल्याची घटना ताजी आहे . खेरीज , साखर उद्योगाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडून शेट्टी यांनी साखर कारखानदार यांची सहानुभूती मिळवली आहे . पतंगराव कदम , जयंत पाटील , हसन मुश्रीफ , प्रकाश आवाडे या  नेत्यांच्या बोलण्यात शेट्टी यांच्याविषयी पूर्वीची कटुता राहिली नाही.  त्यामुळे उभय काँग्रेसच्या मदतीने शेट्टी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची एक शक्यता आहे .   आत्मक्लेश यात्रेत शेट्टी यांची सरबराई करण्यात शिवसेनेचे स्थानिक नेते आघाडीवर होते . दोन्ही पक्षात भाजपकडून होणार कोंडमारा सतत व्यक्त होत आहे . त्यामुळे सेनेच्या मदतीने शेट्टी आगामी निवडणूक लढवतील, अशीही शक्यता आहे .  ही सारी स्थिती पाहता शेट्टी यांचा आगामी राजकीय प्रवास आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीचे रणांगण हे दोन्हीही लक्षवेधी ठरणार , यात संदेह नाही .

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 1:26 am

Web Title: raju shetti leaves nda
Next Stories
1 शहाणे करून सोडावे सकळ जना..
2 डी. वाय. पाटील घराण्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघात लक्ष घालावे
3 राधानगरी धरण शंभर टक्के भरले; पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
Just Now!
X