कोल्हापूर : भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. काँग्रेसने अमेरिकेचे अध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे. उभय देशातील चांगल्या संबंधांना बाधा आणणारे कृत्य त्यांनी करू नये, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे मंगळवारी केली.

काँग्रेसच्या सत्ताकाळात अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन भारतात आले होते. त्यांनी त्यांचे तेव्हा स्वागत केले होते. आता वेगळी भूमिका घेणे अयोग्य आहे, याकडे लक्ष वेधून आठवले यांनी दोन्ही देशांचे संबंध दृढ होण्याची गरज व्यक्त केली. ‘खरे तर पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम भारत-अमेरिका करणार आहेत.  काश्मीरमधील दहशतवाद संपवण्याचे नियोजन आहे. अमेरिकेची भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याची भूमिका आहे. हे भारताच्या फायद्याचे आहे.’

महाविकास आघाडी सरकार अधिक काळ टिकणार नसल्याच्या  नारायण राणे यांच्या वक्तव्यावर आठवले म्हणाले, की त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही हालचाल असेल, पण हे सरकार कधी पडेल सांगता येत नाही. तीन पक्षांत अजून एकमत नसल्याने सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नाही.

आठवलेंची मिश्किली

ट्रम्प यांचा पक्ष आणि आठवले यांचा पक्ष याच्या साम्यतेवर आठवले यांनी मिश्किली केली. ते म्हणाले ‘शिवाय ड्रोनाल ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे आहेत, आणि मी त्या पार्टीचा अध्यक्ष आहे.’ यावर कार्यकर्त्यांनी हसून दाद दिली.