News Flash

परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची फी परत करा; राजू शेट्टींची राज्य शासनाकडे मागणी

पुढील वर्षी फी माफीबाबतही दिले संकेत

कोल्हापूर : राज्यातील परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी परत कराव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाविद्यालयांतर्गत असलेल्या यावर्षीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी परत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

राज्यातील शिवाजी विद्यापीठांतर्गत तीन जिल्ह्यातील एकूण २७९ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांकडून लॉकडाउनपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी वसूल करण्यात आली आहे. या सर्व महाविद्यालयात वेगवेगळ्या विभागातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीमधून सुमारे साडेतेरा कोटी रूपये विद्यापीठाकडे जमा झाले आहेत.

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये असे लाखो विद्यार्थी असून त्या विद्यार्थ्यांची फी माफ होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर, कामगार, तसेच गरीब सर्वसामान्य वर्गातील आहेत. करोना प्रादुर्भावाने लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतीमालाला भाव नाही. त्यातच राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासाठी घेतलेली फी देखील विद्यार्थ्यांना परत करुन पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

पुढील वर्षी फी माफी?

राजू शेट्टी यांच्या मागणीवर सामंत म्हणाले, “विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मात्र, विद्यार्थांना परीक्षा फी परत देण्यामध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास त्याच फीमध्ये पुढील वर्षीच्या परीक्षा घेतल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 9:05 pm

Web Title: refund student fees due to exam cancellation raju shettys demand to the state government aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून अध्ययन सुरु – उदय सामंत
2 “फडणवीस नागपूरला जरी गेले, तरी…”; महाविकास आघाडीला चंद्रकांत पाटलांचा चिमटा
3 साखर उद्योगाची जाणीव फडणवीसांना झाली याचे समाधान; हसन मुश्रीफांचा टोला
Just Now!
X