‘एनडीआरएफ’ची पथके दाखल, स्थलांतराला सुरुवात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेसह प्रमुख नद्यांनी गुरुवारी इशारा पातळी ओलांडली असून आता त्या धोका पातळीच्या दिशेने वाहत आहेत. जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.  ‘एनडीआरएफ’च्या दोन पथकांनी बचाव कार्याला सुरुवात केली आहे. आणखी दोन दिवस मोठा पाऊ स पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पूरग्रस्तांच्या स्थलांतराला सुरुवात केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस वेधशाळेने ‘रेड अलर्ट’ दिला होता. जिल्ह्यात सलग चार दिवस धो धो पाऊ स कोसळत आहे. पावसाची गती वाढल्याने येथील पंचगंगा नदीने ३९ फूट ही इशारा पातळी ओलांडली. नदीच्या पाण्याची वाढती गती पाहता आज रात्री ती धोका पातळी ओलांडणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय, जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्याही इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत.

बचाव कार्याला सुरुवात

जिल्ह्यातील पूर परिस्थिती लक्षात घेऊ न एनडीआरएफचे पथक पाचारण केले आहे. दोन तुकडय़ा जिल्ह्यात दाखल झाल्या असून एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी २५ जवानांची २ पथके सज्ज झाली आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पथक प्रमुख निरीक्षक ब्रिजेशकुमार रैकवार, निरीक्षक बलबीरलाल वर्मा, उपनिरीक्षक अजयकुमार यादव यांच्याशी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती चर्चा केली. जिल्ह्यात मदतकार्य करताना या पथकाला अडचण आल्यास प्रशासन सहकार्य करेल, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी जवानांना आश्वसित केले. करोना परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेऊ न मदतकार्य करण्यासाठी पथक सज्ज असल्याचे रैकवार यांनी नमूद केले. चिखली, आंबेवाडी, कळे या नेहमी पूर येणाऱ्या भागात त्यांनी मदत कार्य सुरू ठेवले आहे. कोल्हापूर शहरातील कुटुंबाचे आज दुपारी स्थलांतर स्थलांतरास सुरुवात झाली आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना आज रात्री स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या असून या दृष्टीने स्थानिक प्रशासन कार्यरत झाले आहे.

वाहतूक विस्कळीत                      

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा वेग वाढला असून १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. सुमारे पंचवीस मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.