19 February 2020

News Flash

ऋतुराज पाटील विधानसभा लढणार – सतेज पाटील

महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक यांच्याशी संजय मंडलिक व सतेज पाटील यांचे राजकीय वैर आहे.

ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी कटिबद्ध झाल्याची ग्वाही खासदार संजय मंडलिक आणि आमदार सतेज पाटील यांनी हातमिळवणी करून दाखवून दिली. (छाया - राज मकानदार)

खासदार संजय मंडलिक मदत करणार

कोल्हापूर  :  कोल्हापूर दक्षिण या मतदार संघातून ऋतुराज पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याची घोषणा माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी कार्यकर्ता मेळाव्यात केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीला केलेल्या मदतीची परतफेड करण्याचा निर्णय घेत खासदार संजय मंडलिक यांनी सतेज पाटील देतील त्या उमेदवाराला बळ देण्याची घोषणा करीत त्यांनी ऋतुराज यांची पाठराखण केली.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे. त्यातील रणनीतीचा एक भाग म्हणून काँग्रेसचे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ घटू नये यासाठी  विधान परिषद आमदारांना विधानसभेची उमेदवारी न देण्याच्या निर्णय घेतला असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पाच दिवसांपूर्वी कोल्हापुरात स्पष्ट केले होते.

दक्षिणचे उत्तर मिळाले

यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांच्याऐवजी अन्य उमेदवाराचा शोध सुरू होता. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज सतेज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डझनभर वक्त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू संजय डी. पाटील यांचे सुपुत्र आणि सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला.

खासदार मंडलिक आणि आमदार पाटील यांनी ऋतुराज याना निवडून आणण्यासाठी कंबर कसण्याचा निर्धार बोलून दाखवला आणि त्यातून काँग्रेसचे दक्षिणचे काय? याचे उत्तर मिळाले.

आता मंडलिकांचे ‘आमचं ठरलंय’

लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात जात आमदार पाटील यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा प्रचार केला होता. या मदतीबद्दल मंडलिक यांनी आज पुन्हा कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आता विधानसभेला मंडलिक यांनीही ‘आमचं ठरलंय ‘ असा पाटील यांचाच निवडणुकीत गाजलेला शब्द उच्चारून ऋतुराज यांना मदत करण्याचा निर्वाळा दिला.

मंडलिक-पाटील आणि महाडिक

महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक यांच्याशी संजय मंडलिक व सतेज पाटील यांचे राजकीय वैर आहे. यातून मंडलिक-पाटील यांची गट्टी जमली आहे. लोकसभेत महाडिक यांचा पराभव केल्यानंतर विधानसभा निवडणुकीला दक्षिणचे आमदार अमल महादेवराव महाडिक यांचा पराभव हे या दोघांचे उद्दिष्ट असणार आहे. तर, महाडिक पराभवाची परतफेडच करण्याच्या तयारीला लागले असल्याने दक्षिणची लढाई तुंबळ होण्याची चिन्हे आहेत.

 

First Published on September 6, 2019 5:32 am

Web Title: ruturaj patil to contest assembly polls says satej patil zws 70
Next Stories
1 कोल्हापूरात पुन्हा धारांचे तांडव, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
2 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर
3 राजू शेट्टी- सदाभाऊ खोत यांच्यात पुन्हा संघर्ष
Just Now!
X