यवतमाळसारख्या दुर्दैवी घटना पुन्हा राज्यात घडू नये यासाठी चीनहून चोरटय़ा मार्गाने राज्यात येणाऱ्या उपकरणावर बंदी आणली जाणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कीटकनाशक फवारणी करणाऱ्या पंपाद्वारे जादा मात्रेची फवारणी होऊन शेतकरी दगावल्याचे निदर्शनास आले असल्याने अशी उपकरणे चीनमधून आणली जाणार नाहीत याची खबरदारी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना घेण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

खोत यांनी येथे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,  शेतकऱ्याला कृषीविषयक औषधांची विक्री करत असताना सुरक्षा कीट देणे ही उत्पादक कंपनी व विक्रेते यांची जबाबदारीच आहे. ज्या कंपन्या सुरक्षा कीट देत नसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. परवानाधारक दुकानांकडे बंदी असलेली औषधे विक्रीसाठी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

परवानाधारक दुकानांमध्ये ज्या औषधांवर बंदी आहे, अशी औषधे आढळल्यास त्या दुकांनावर कडक कारवाई केली जाणार आहे. बंदी घातलेली औषधे कोणत्याही दुकानांमध्ये दिसता कामा नयेत, अशा सूचना दिल्या आहेत, असे सांगून खोत म्हणाले, कारवाईमध्ये हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्हा कृषी अधिकारी, गुणनियंत्रण अधिकारी यांची स्वतंत्र तपासणी पथके करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. ज्या औषध कंपन्या प्रमाणीकरण न केलेल्या औषधांचे उत्पादन करतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. खोत म्हणाले, अलीकडे ऑनलाइन पद्धतीने औषधांची विक्री करणाऱ्या तसेच टोल फ्री क्रमांक देणाऱ्या औषधांची मागणी नोंदवून त्यांना पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांनाही कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. कोल्हापुरात कार्यरत असणाऱ्या कृषी कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून बेकायदेशीरपणे औषधे आणली जात आहेत. अशा औषधांवर व चिनी बनावटींच्या औषध फवारणी पंपावर बंदी घालण्याचा विचार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे कृषी अधिकारी उमेश पाटील आणि सामेतीचे उपसंचालक संभाजी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.