राज्यातील रेड झोनचा विभाग सोडून अन्यत्र चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकारात्मक भूमिका घेतली. कोल्हापूरात चित्रीकरणासाठी अनुकूल वातावरण असल्याने मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक कलाकार, तंत्रज्ञान यांनाही करोनाच्या संकटकाळात कामाची संधी उपलब्ध होणार आहे.

देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण पूर्णता ठप्प झाले आहे. चित्रीकरणाचे केंद्रस्थान असलेल्या मुंबई येथील स्टुडिओमधील हालचाली पूर्णपणे थांबलेल्या आहेत. यातूनच चित्रपट निर्मितीचा इतिहास आणि परंपरा असलेल्या कोल्हापुरात चित्रीकरण सुरू व्हावे, असा प्रयत्न सुरू होता.

कोल्हापूरमध्ये अद्यावत चित्रनगरी तयार झाली आहे. आजूबाजूला चित्रीकरणासाठी अनेक आकर्षक स्थळे आहेत. शिवाय कलाकार, तंत्रज्ञ यांची ही मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. मुंबईच्या तुलनेत कोल्हापुरात चित्रीकरण करणे हे निर्मात्याला खर्चाच्या दृष्टीने परवडणारे आहे. यातूनच पालकमंत्री सतेज पाटील, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी बैठक घेऊन कोल्हापुरात चित्रीकरण सुरू व्हावे असा प्रयत्न केला होता. याबाबत मुंबईतील निर्माते-दिग्दर्शक यांच्याशी चर्चा झाली असता त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट, मालिका, चित्रवाहिनी क्षेत्रातील प्रमुखांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी मनोरंजन क्षेत्राला गती देण्यासाठी शासन पुढाकार घेत असल्याचे सांगितले. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टंसिंग राखून चित्रीकरण कसे करता येईल, याबाबतची नियमावली सादर करावी. त्याला पाठबळ दिले जाईल, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

मुंबई सध्या रेड झोनमध्ये असल्यामुळे तिथे चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे चित्रीकरणासाठी परिपूर्ण असणाऱ्या कोल्हापुरात पुन्हा एकदा चित्रीकरणाला गती येण्याची शक्यता आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, “कोल्हापुरात चित्रीकरण सुरू होण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. आज झालेल्या बैठकीतून त्यांनी व्यक्त केलेली भूमिका पाहता कोल्हापुरात चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. याचा स्थानिक कलाकारांना लाभ होण्याबरोबरच कोल्हापूरच्या अर्थकारणालाही यामुळे चालना मिळू शकेल.”

७० हिंदी, ४० मराठी आणि १० ओटीटी अशा ११० मालिकांची चित्रीकरणे करोनामुळे थांबली असून ३ लाख कामगार व तंत्रज्ञ यांच्या रोजीरोटीवर परिणाम झाल्याचे निर्मात्यांनी संगितले. ३० हजार एपिसोड दर वर्षी तयार होतात. ५ हजार कोटींची गुंतवणूक हिंदी मालिकांची तर २५० कोटींची गुंतवणूक यात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. निर्मात्यांना विना तारण कर्ज तसेच कमी व्याजाचे कर्ज, एक पडदा चित्रपटगृहाना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटाना अनुदान रक्कम देणे, चित्रपट निर्मिती जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.