रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात रहावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशिल माने यांनी गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नवा कोल्हापुरी पॅटर्न विकसित केला आहे.

रेड झोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातून बऱ्याचशा प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोक येत आहेत. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुढील १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण करावे लागते. यावर पर्याय शोधून खासदार माने यांनी नव्या पद्धतीचा विचार केला आहे. याबाबत सांगताना माने म्हणाले, “करोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर घर रिकामे करायचे. त्याघरात राहत असणाऱ्या सदस्यांनी आपल्या भाऊबंदांकडे, शेजाऱ्यांकडे रहायचे. पुढील १४ दिवस संपर्कात यायचे नाही. त्या घराच्या फलकावर अलगीकरण कालावधी लिहायचा. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय त्यांच्या घरच्या लोकांनीच करायची, या बाबींचा या पॅटर्नमध्ये समावेश आहे.”

जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची क्वारंटाइनसाठी सोय करण्यात प्रशासनाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे गावच्या सुरक्षिततेसाठी गावाच्या मदतीने या नव्या पॅटर्नची सुरूवात शाहुवाडी-पन्हाळा येथून करीत असल्याचेही खासदार माने यांनी सांगितले. घरच्या लोकांनी आपल्या गावच्या सुरक्षिततेसाठी घर रिकामे करून बाहेरून येणाऱ्या आपल्याच लोकांना द्यावे आणि काही दिवस दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी नव्या पॅटर्नच्या निमित्ताने केले आहे.

पॅटर्नचे फायदे

प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामास मदत होईल. कुटुंबाला पर्यायाने गावाला धोका होणार नाही. सामाजिक बांधिलकी, एकोपा वृध्दिंगत होण्यास मदत होईल तसेच अलगीकरणाचेही तंतोतंत पालन केले जाईल.