News Flash

कोल्हापूरमधील विजयाने आघाडीचा आत्मविश्वास दुणावला

भाजपला धक्का दिल्यानंतर आता ‘गोकुळ’चे लक्ष्य

भाजपला धक्का दिल्यानंतर आता ‘गोकुळ’चे लक्ष्य

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : नगर परिषदेच्या छोटय़ा मैदानात कुस्ती मारल्यानंतर ‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपला आस्मान दाखवून महाविकास आघाडीने यश संपादन केले आहे. महाविकास आघाडीचा राजकीय आत्मविश्वास वाढवणारा हा विजय असून आगामी ‘गोकुळ’सह अन्य महत्त्वाच्या निवडणुकीत तो उपोगी पडणार आहे.

विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषदेतील सत्ता गमवावी लागल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे. तर, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रभावी यश मिळवले आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक अडीच वर्षांंपूर्वी झाली तेव्हा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेस इतक्याच १४ जागा भाजपने मिळवल्या. राष्ट्रवादीने ११, त्याहून एक कमी जागा शिवसेनेने मिळवली. स्थानिक आघाडय़ांनी २-४ जागा मिळवल्या. अशा स्थितीत सत्ता स्थापन करणे हे आव्हान होते. तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या परिस्थितीत भाजपची सत्ता पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत आणली. अर्थात त्यासाठी त्यांना माजी आमदार महादेवराव महाडिक यांची थेट, तर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांची अप्रत्यक्ष मदत झाली होती. या राजकीय उलथापालथीमध्ये महाडिक घराण्याला हुकलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. अडीच वर्षांत जिल्हा परिषदेला भाजपची सत्ता राज्यात असतानाही पुरेसा निधी मिळाला नाही. निधी वाटपावरून सत्तारूढ गटात खदखद होती. त्याचा फायदा उठवत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आघाडीची सत्ता आणू अशी भाषा तीन वर्षांपासून सुरू केली होती.

नवा अध्यक्ष निवडण्यासाठी राजकीय खलबतांना गेला महिनाभर ऊत आला होता. याच वेळी राज्य पातळीवरही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता स्थापन झाली. कोल्हापूर जिल्ह्य़ाला तीन मंत्रिपदे मिळाली. मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्हा परिषदेसाठी बळ मिळाले. त्यातूनच सतेज पाटील यांनी ६७ पैकी ४० सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तथापि चंद्रकांत पाटील यांनी विनय कोरे, प्रकाश आवाडे, महाडिक परिवार यांना सोबत घेऊ न सत्ता टिकवण्याचे प्रयत्न चालवले होते. तुल्यबळ सामना असल्याने कोणाची सत्ता येणार याबाबत टोकदार संघर्ष निर्माण झाला होता. अखेर त्यामध्ये महाविकास आघाडीने यश मिळवले आहे.

चंद्रकांत पाटील यांना धक्का

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यावेळी पूर्वीसारखा करिष्मा करून दाखवता आला नाही. विधानसभा निवडणुकीत ‘भाजपमुक्त कोल्हापूर’ अशी अवस्था झाली होती. हातकणंगले आणि चंदगड या नगर परिषद निवडणुकांत भाजपपासून यश दूर गेले. आता तर जिल्हा परिषदही गमवावी लागली आहे. राज्याची जबाबदारी असलेल्या चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या जिल्ह्य़ातीलच सत्तास्थाने गमवावी लागत आहेत. कालपर्यंत दुय्यम विरोधक प्रबळ होत असल्याने भाजपसाठी कोल्हापूर जिल्ह्य़ाचा राजकीय पेपर आणखी कठीण बनणार असल्याचे या निकालातून दिसत आहे.

महाडिक यांच्यासाठी धोक्याची घंटा

गतवेळी जिल्हा परिषदेत अध्यक्षपद निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात चंद्रकांत पाटील यांनी ही जबाबदारी महादेवराव महाडिक यांच्याकडे सोपवली. त्यांनी राजकीय कसब पणाला लावून नव्या जोडण्या घालून आपल्या सूनबाईंना अध्यक्ष बनवले. पुढे लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांचा पराभव झाला. आता जिल्हा परिषद गमावण्याची वेळ महाडिक यांच्यावर आली आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील मंत्री झाल्याने त्यांची राजकीय ताकद वाढली असल्याने महाडिक यांच्यापुढे जिल्ह्य़ातील सर्वाधिक मलईदार सत्तास्थान असलेले ‘गोकुळ’ टिकवणे ही कसोटी असेल.

आता महाविकास आघाडीच्या रूपाने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रभावी ठरली आहे. यामुळे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्य़ात आपले नेमके अस्तित्व काय आहे, याचा प्रत्यय आला असावा. यापुढे महाविकास आघाडी ‘गोकुळ’मध्ये यश मिळवण्यासाठी सिद्ध झाली आहे.

– सतेज पाटील, काँग्रेसचे मंत्री

भाजपला शह देण्यासाठी तीन पक्षांची महाविकास आघाडी आकाराला आली आहे. पर्यायाने या आघाडीचे संख्याबळ वाढणे स्वभाविक आहे. त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा परिषदेत आघाडीला यश मिळाले असले तरी भविष्यात भाजप आपली राजकीय ताकद निश्चितपणे दाखवून देईल.

–  महेश जाधव, माजी अध्यक्ष, कोल्हापूर महानगर भाजप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2020 3:17 am

Web Title: the victory in kolhapur showed confidence in maha vikas aghadi zws 70
Next Stories
1 कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला धक्का
2 महाविकास आघाडीचा प्रयोग ग्रामीण भागात यशस्वी
3 कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तानाटय़ात चुरस
Just Now!
X