केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या यादीत सोलापूरचा समावेश झाल्याबद्दल गेले चार दिवस महापालिकेत जल्लोष सुरू असतानाच, ईसीस नावाच्या अतिरेकी संघटनेच्या नावाचा उल्लेख करून पालिका आयुक्त विजय काळम-पाटील यांना सोमवारी धमकीचे पत्र आले आहे. शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्याच्या मुद्यावर हे धमकीचे पत्र आल्याचे आयुक्त काळम-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, हे धमकीचे पत्र खरोखरच ईसीसच्या अतिरेक्यांकडून आले की हा केवळ खोडसाळपणा आहे किंवा अन्य दुसऱ्याच समाजविघातक शक्तीचे हे कारस्थान असू शकते, याचा तपास शहर पोलीस करणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात जवळपास सर्व लहान-मोठय़ा शहरांमध्ये बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. सोलापुरात गेल्या सहा महिन्यात या कारवाईला मुहूर्त लागला नाही. प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने ही कारवाई प्रशासनाकडून पुढे ढकलली जात आहे.
या पाश्र्वभूमीवर केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या यादीत सोलापूरला स्थान मिळाल्याबद्दल गेले चार दिवस महापालिकेत जल्लोष सुरू असून पालिका आयुक्त काळम-पाटील हे हार-तुऱ्यांच्या स्वागत तथा सत्काराच्या कार्यक्रमात व्यस्त असतानाच इकडे सोमवारी आयुक्त काळम-पाटील यांना धमकीचे पत्र आले आहे. धार्मिक स्थळाची एक जरी वीट काढली तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्याचे उत्तर दगडाने नव्हे, तर एके ४७ आणि बॉम्ब हल्ल्याने देऊ, असे पत्रात धमकावण्यात आले आहे. या पत्रात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर व सिध्देश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याविषयी एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आला आहे.
या धमकी पत्राची माहिती देताना पालिका आयुक्त काळम-पाटील यांनी, कायद्यानुसार धार्मिक स्थळे कोणत्याही जाती-धर्माची असोत, ती बेकायदेशीर असतील आणि नियमित करणे केवळ अशक्य असतील तर अशा बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर हातोडा घालण्यात येणार आहे. यात कोणत्याही दबावतंत्राला भीक घालणार नाही, असा निर्धार बोलून दाखविला. हे धमकी पत्र पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे.