संततधार पावसामुळे घरातील पोटमाळा कोसळून ढिगाऱ्याखाली सापडून आजोबा  आणि नातू अशा दोघांचा इचलकरंजी येथे मृत्यू झाला. महादेव बाळू नाझरे (वय ६०) आणि प्रथमेश मनोहर नाझरे (वय १०) अशी दोघांची नावे आहेत. या दुर्घटनेत अकरा महिन्यांच्या बालकासह सात जण जखमी झाले आहेत. संततधार पावसामुळे दुर्घटना घडण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास गावभागातील माणगांवकर बोळ परिसरात घडली. या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.

इचलकरंजीतील  गावभाग परिसरातील माणगांवकर बोळ येथे रमेश मिठारी यांचे  सुमारे ६५ वर्षांपूर्वीचे दगड, मातीचे बांधकाम असलेले घर आहे. या घरात काही वर्षांपासून महादेव नाझरे हे कुटुंबीयांसह भाडय़ाने राहण्यास होते. नाझरे यांची सून सुजाता मनोहर नाझरे (वय ३०), नातू प्रथमेश (वय १०) यांच्यासह सुजाता यांची बहीण उमा परशराम भांबुरे (वय २१) हे एकत्र राहतात. सुजाता यांची आणखी एक बहीण मनीषा सचिन बगाडे व त्यांचा मुलगा देवदत्त (वय ११ महिने, दोघे रा. औरवाड) हे सुट्टीनिमित्त इचलकरंजीत आले होते. तर कालच सुजाता यांचे वडील परशराम रामचंद्र भांबुरे (वय ६०), आई लक्ष्मी परशराम भांबुरे व बहीण सविता परशराम भांबुरे (वय २१, तिघे रा. औरवाड ता. शिरोळ) हे तिघे जण भेटण्यासाठी शुक्रवारी आले होते. नाझरे राहण्यास असलेले घर हे अत्यंत दाटीवाटीची वस्तीत असून गावभागातील जुन्या बांधकामापकी आहे. या घरात दोन खोल्या असून पकी एक स्वयंपाक घर आहे.

शुक्रवारी रात्री दहा वाजता सर्व जण एकाच खोलीत झोपले होते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोटमाळा कोसळल्याने मोठा आवाज झाला. याच घराच्या दुसऱ्या बाजूस सुहास व त्यांची पत्नी अर्चना पांगिरे राहतात. त्यांनी शेजाऱ्या-पाजऱ्यांना उठविले. अर्चना यांनी धाडसाने प्लायवूडचा दरवाजा मोडून काढला. त्या वेळी आतील भीषण दृश्य दिसून आले. नाझरे व भांबुरे कुटुंबीयांच्या नाका, तोंडात माती गेल्याने त्यांचा श्वास गुदमरत होता. त्याच वेळी भागातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू करत ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली सापडल्याने महादेव यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सदस्यांना ढिगाऱ्याबाहेर काढले. प्रथमेश नाझरे याला प्रकृती गंभीर असल्याने कोल्हापूर येथे नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर अकरा महिन्यांचा देवदत्त याच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले.