आंदोलनानंतर पाणी सोडण्याची ग्वाही देऊनही पाणी न सोडल्याने मंगळवार पेठ परिसरातील संतप्त जमावाने इचलकरंजी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना शनिवारी रात्री धक्काबुक्की केली. तर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे अभियंता बाजी कांबळे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. या प्रकारामुळे पाणी आंदोलन वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. सुमारे दोन तासाहून अधिक काळ नागरिकांनी कॉ. मलाबादे चौकातील सर्व रस्ते रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अखेरीस काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत सोमवारी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दोन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलनाचे सत्र तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. सकाळी मंगळवार पेठ परिसरातील महिला व नागरिकांनी गांधी चौकात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत पालिकेचे अभियंता बाजी कांबळे व शाम जावळे हे आंदोलनस्थळी आले. वादातून काही नागरिकांनी जावळे यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. नगरसेवक रवींद्र माने, महेश ठोके, माधुरी चव्हाण, संगीता आलासे यांच्यासमोरच हा प्रकार सुरू होता. अखेरीस दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाणी सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र आश्वासन देऊनही दुपारच्या सत्रात पाणी न सोडल्याने नागरिकांनी पुन्हा नारायण चित्रमंदिर परिसरात पुन्हा रास्तारोको सुरू केला. नगराध्यक्षा बिरंजे, अति. मुख्याधिकारी पोतदार यांना घेऊन नगरसेविका चव्हाण, महेश ठोके आंदोलनस्थळी आले. नगराध्यक्षांची गाडी दिसताच आक्रमक आंदोलक महिलांनी बिरंजे व पोतदार यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी नगराध्यक्षा व अति. मुख्याधिकारी यांना गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नगराध्यक्षांना शॉिपग सेंटरमधील एका कापड दुकानात नेऊन बसविल्याने आंदोलक आणखीन संतापले. महिलांनी सदर दुकानाच्या दारातच ठिय्या मारत नगराध्यक्षांना कोंडीत पकडले. सोमवारी भागात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.