कोल्हापूर: दख्खनचा राजा जोतिबा मंदिराच्या सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये खर्चाचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला. आराखड्यातील अंमलबजावणी व संनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर परिसर आराखड्याच्या १५०० कोटी व श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याच्या २६० कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती. आज नियोजन विभागाने त्यास मान्यता दिली.
मंदिराचा कायापालट
या विकास आराखड्यांतर्गत श्री जोतिबा मंदिर संवर्धन, यमाई मंदिर संवर्धन, पायवाटा संवर्धन-सुशोभीकरण, डोंगरकड्यांचे संवर्धन करणे, देवस्थान समिती कार्यालय बांधणे, दोन ठिकाणी ज्योत स्तंभाची निर्मिती करणे आदी कामे होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५९.५९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, त्यांपैकी ८१.६० कोटींच्या कामे नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने आज प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कामांना तत्काळ सुरुवात – येडगे
विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या कामांना लगेचच सुरुवात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी सांगितले.