कोल्हापूर : काश्मीरमधील पहलगाम येथे पोहोचण्यासाठी घोडे वेळेत उपलब्ध झाले नाहीत म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून पर्यटनासाठी गेलेल्या २८ जणांवरील संकट दूर झाले. एका अर्थाने त्यांचे प्राण वाचले आहेत. हा थरारक अनुभव अनिल कुरणे आणि सहकाऱ्यांनी कथन केला.
कोल्हापूर व परिसरातून २८ जणांचा चमू जम्मू-कश्मीर येथे पर्यटनासाठी गेला आहे. काल दुपारी हे सर्वजण पहेलगाम परिसरात पर्यटनासाठी जाण्याची तयारी करत होते. आराम बसने हे सर्वजण पहेलगामपासून दीड किमी अंतरावर होते. तेथे जाण्यासाठी घोड्यांची गरज असते. सर्व २८ जणांना घोडे उपलब्ध होण्यासाठी काही वेळ गेला. पुरेशा प्रमाणात घोड्यांची उपलब्धता झाल्यावर बहुतेकांनी घोड्यावर स्वार होण्याची तयारी केली. तिकडे कूच करणार इतक्यातच बसचालकाने ‘त्या बाजूला गोळीबार सुरू आहे; जाऊ नका,’ अशी हिंदीमध्ये विनंती केली. त्याचे या प्रवाशांना आश्चर्य वाटले.
परंतु परिस्थितीची जाणीव होताच सर्वांना धक्का बसला. त्यांनी पटकन घोड्यावरून खाली उतरणे पसंत केले. ते सर्वजण तातडीने सुखरूप ठिकाणी परतले. ‘कालचा प्रकार धक्कादायक होता. आम्ही आता सर्वजण सुखरूप आहोत,’ असे या चमूचे प्रमुख अनिल कुरणे यांनी सांगितले.
कोल्हापुरातील पर्यटक सुखरूप
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ७५ प्रवासी काश्मीर परिसरात आहेत. ते सर्वजण सुरक्षित आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. विमान उपलब्धतेनुसार त्यांना उद्या, परवा कोल्हापुरात आणण्याची व्यवस्था केली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.