३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचे उद्या अनावरण

ढोबळ मानाने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि त्यानंतर जवळच्या रंकाळा तलावाची सर.. हे म्हणजेच कोल्हापूरचे पर्यटन असे काहीसे चित्र करवीरनगरीत दिसते, पण याच्याही पलीकडे जाणारे आणि देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारी आणखी एक प्रभावी खूण या नगरीत उमटत आहे. ती म्हणजे तब्बल ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ होय. हा राज्यातील सर्वात उंच तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च ध्वजस्तंभ आहे.

कोल्हापूरचा इतिहास प्राचीनतेच्या खुणा दर्शवणारा. अलीकडच्या काळात पुरोगामी शहर अशी वेगळी ओळखही झालेली. महालक्ष्मी मंदिर, जोतिबा, पन्हाळा यासह कोल्हापुरी गूळ, चप्पल, दागिने, तांबडय़ा-पांढऱ्या रश्श्यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध.

अशा या कोल्हापूरची लवकरच देशात वेगळी ओळख निर्माण होणार आहे. राज्यातील सर्वाधिक उंचीचा तर देशातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीच्या (३०३ फूट उंच) झेंडा उभारण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. ध्वजस्तंभाची उभारणी झाली असून, शनिवारी सायंकाळी स्तंभास ध्वज बसवण्याचे काम चालू होते. या ध्वजस्तंभामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नोव्हेंबर २०१६ रोजी पोलीस मुख्यालयात झालेल्या बठकीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ध्वजस्तंभाची संकल्पना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली.

यानंतर पालकमंत्री पाटील यांनी हा स्तंभ कोल्हापुरातच उभा करण्याचा निर्धार करून तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बठका घेतल्या.

यानंतर अवघ्या महिन्याभरातच या कामास प्रारंभ झाला आणि अवघ्या पाच महिन्यांत हा स्तंभ उभा राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ मे रोजी याचे अनावरण होणार आहे.

ध्वजस्तंभ नवे पर्यटन केंद्र

अलीकडे कोल्हापूर पर्यटकांचे आवडते केंद्र बनत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण योजना आखल्या आहेत. विविध पर्यटनभेटींचे आयोजन करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींना कोल्हापुरात बोलावून त्यांना कोल्हापूरचे सौंदर्य तसेच पर्यटनाची माहिती करून दिली. पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले. तसेच राज्यातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ उभा करून कोल्हापूरकडे पर्यटकांचा ओढा वाढण्याच्या दृष्टीने ध्वजस्तंभ हे आणखी एक पाऊल टाकले आहे. सर्वाधिक मोठा ध्वजस्तंभ पाहण्यासाठी कोल्हापुरात पर्यटक येऊ लागले तर येथील हॉटेल, लॉज, रिक्षाचालकांना अच्छे दिन येतील.

देशातील काही उंच ध्वजस्तंभ

वाघा बॉर्डर (आटरी) ३५० फूट,  कोल्हापूर ३०३ फूट, रांची (झारखंड)  २९३  फूट,      तेलंगणा   २९१ फूट,  रायपूर (राजस्थान) २६९ फूट,  फरिदाबाद (हरयाणा) २५० फूट, कात्रज (पुणे) २३७ फूट.