कोल्हापूर : बर्डस ऑफ कोल्हापूर आयोजित कोल्हापूर पक्षी गणनेच्या पाचव्या हंगामातील दुसऱ्या भागाची पक्षी गणना महालक्ष्मी तलाव, पेठ-वडगांव येथे झाली. या पक्षी गणनेमध्ये ९४ प्रजातींच्या ८८२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये २४ स्थलांतरित प्रजाती, ३ स्थानिक-स्थलांतरित तर ६७ रहिवासी प्रजातींची नोंद करण्यात आली.
पक्षी गणनेमध्ये बर्डस ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई यांनी मार्गदर्शन केले. पृथ्वीराज सरनोबत व मंदार रुकडीकर यांनी पक्षी गणनेच्या अचूक नोंदी केल्या. डॉ. राजन अतिग्रे, सुमित माळी यांनी वन्यजीवांबद्दलचे अनुभव सांगितले.
पाणी घटल्याने धोका
बर्डस ऑफ कोल्हापूरच्या सर्वेक्षणातील नोंद अशी, एल निनोमुळे तलावाची पाण्याची पातळी खूपच कमी झाली असून, येथील जलसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. येत्या उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची भिती आहे. एकूणच घटनाक्रमाची, पक्षी आणि त्यांच्या रहिवासावर होणाऱ्या परिणामाची नोंद बर्डस ऑफ कोल्हापूर ठेवत आहे.
स्थलांतरित पक्षी याप्रमाणे
रुडी शेलडक (चक्रवाक), बुटेड इगल (सुतुंग), कॉमन ग्रीनशँक (हिरव्या पायाचा टीलवा), ग्रीन सांडपायपर (हिरवी तुतारी), वूड सांडपायपर (कवड्या तुतारी), कॉमन सांडपायपर (सामान्य तुतारी), लिटल स्टिंट (छोटा टीलवा), टेमींकस् स्टिंट (टेमींकचा टीलवा), बार्न स्वालो (माळ भिंगरी), ब्राउन श्राइक (तपकीरी खाटीक), ऐशी ड्रोंगो (राखाडी कोतवाल), रेड थ्रोटेड फ्लायकॅचर (लाल कंठाची मशिमार), क्लॅमरस रीड वॉब्लर (दंगेखोर बोरु वटवट्या), ब्लिथस् रीड वॉब्लर (ब्लिथचा बोरु वटवट्या), साईक्स वॉब्लर (साईक्सचा वटवट्या), बुटेड वॉब्लर (पायमोज वटवट्या), लेसर व्हाईटथ्रोट (छोटा शुभ्रकंठी वटवट्या), सायबेरीयन स्टोनचॅट (सायबेरीयाचा गप्पीदास), ब्लिथस् पीपीट (ब्लिथची तिरचिमणी), रिचर्डस् पीपीट (रिचर्डची तिरचिमणी), वेस्टर्न यल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), सिट्रीन वॅगटेल (पिवळ्या डोक्याचा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी), ग्रे वॅगटेल (करडा धोबी).
संकटग्रस्त यादीतील प्रजाती याप्रमाणे
पैंटेड स्टोर्क (चित्रबलाक), वुली नेक स्टोर्क (पांढऱ्या मानेचा करकोचा), ब्लॅक हेडेड इबिस (पांढऱ्या डोक्याचा शराटी), इंडियन रिव्हर टर्न (नदी सुरय)