कोल्हापूर : सहा वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या दांपत्यास कोल्हापूर पोलिसांनी दोन दिवसात अटक केली. अपहृत बालकास मंगळवारी पालकांकडे सोपवण्यात आले आहे. सुषमा राहुल नाईकनवरे (रा. सातारा) या आदमापूर येथील बाळूमामा मंदिरात देव दर्शनासाठी आल्या होत्या. ४ मार्च रोजी त्या आंघोळीसाठी गेल्या असताना त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाला अनोळखी स्त्री व पुरुषाने पळून नेले. याचा गुन्हा भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता.
कर्नाटकातून पलायन
तीर्थक्षेत्रावरून मुलास पळून नेण्याची बाब गंभीर आणि भाविकांसाठी भावनिक असल्याने कोल्हापूर पोलिसांनी ७ तपास यंत्रणा कार्यरत केल्या. संशयित गुन्हेगार हे कर्नाटक हद्दीत निपाणी, चिकोडी या कर्नाटक राज्यातील मार्गे मिरज कडे गेल्याचे दिसून आले.
हेही वाचा >> पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागापोटी बलात्कारित अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला
९५ सीसीटीव्ही तपासले
या मार्गावरील ९५ ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुचाकीचा शोध घेतला असता ती अभिलेखावरील गुन्हेगार मोहन अंबादास शितोळे (वय ५०, मूळ रा. मेढा, ता. जावळी) व त्याची पत्नी छाया मोहन शितोळे यांची असल्याचे निष्पन्न झाले. माहितीच्या आधारे पथकाने त्यांच्या गावी जाऊन संशयित पती-पत्नीसह मुलासह ताब्यात घेतले.