तब्बल १९ तास गणेश विसर्जन मिरवणूक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : ‘स्पिकरच्या भिंती’ना मिळालेला पूर्णविराम, पारंपरिक हलगी, कैचाळ, ढोल-ताशांचा गजर,चित्तथरारक शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके अशा मऱ्हाटमोळ्या वातावरणात, अधून—मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि गणपतीच्या जयघोषात साधेपणाने शहरात विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. सुमारे १९ तास मिरवणूक चालली. यंदा मिरवणूक नेहमीपेक्षा दोन ते तीन तास अगोदरच आटोपल्याने प्रशासनावरचा ताणही हलका झाला होता.

प्रलयंकारी महापुराच्या फटक्यानंतर महिना होण्याआधीच दुसऱ्यांदा ओढवलेले महापुराचे संकट साक्षात ‘विघ्नहर्त्यां’च्या विसर्जनात  आडकाठी ठरले होते. पण त्याच्याच कृपेने दोन दिवसात पूरपातळी निवळल्याने गेल्या दहा दिवसांपासून शहरात आणि ग्रामीण भागात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या लाडक्या श्री गणरायाच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला.

गुरुवारी सकाळी नऊ  वाजता परंपरेनुसार मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्री गणेशाच्या विधिवत पूजेने या मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर माधवी गवंडी, आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह तालीम मंडळाचे पदाधिकारी या वेळी  उपस्थित होते. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश या मुख्य विसर्जन मार्गावर गर्दी झाली होती. या मिरवणुकीत विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांनी देखील लेझीमचा ताल धरला.

रात्री विसर्जन मार्गावर मिरवणूक, त्यातील देखावे पाहण्यासाठी अवघे शहर रस्त्यावर लोटले होते. यंदा ‘स्पिकरच्या भिंती’नसल्याने मिरवणुका रेंगाळत नव्हत्या. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आबालवृद्धांनी ठेका धरला होता. विसर्जन शांततेत पार पडावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे चार हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, स्वयंसेवक यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिवसेनेसह महापालिका आणि विविध पक्ष,संघटनांच्या वतीने विसर्जन मार्गावर सार्वजनिक मंडळांच्या स्वागतासाठी मानाच्या पानसुपारीचे मंडप उभारण्यात आले होते. पहाटे पाचच्या सुमारास मिरवणुकीतील शेवटच्या क्रांती तरुण मंडळाच्या गणेशाची आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत आरती होऊ न विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. पंचगंगा नदी घाटासह, इराणी खण,राजाराम बंधारा, राजाराम तलाव आदि ठिकाणी विसर्जनासाठी तराफ्यांची तसेच क्रेनचीही सोय करण्यात आली होती.

निसर्गाचे चित्र पूर्ववत होऊ  दे

महापुराच्या संकटाने अपरिमित नुकसान सहन करावे लागले आहे. भविष्यात हे निसर्गाचे बदललेले चित्र पूर्ववत होऊन अवघा समाज सुखी होऊ दे, असे साकडे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घातले. पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, निवडणुका आणि व्यक्तिगत स्वरूपात आपण श्री गणेशाकडे कधीही काहीही मागितले नाही. आता फक्त आणि फक्त निसर्गाचे हे बदललेले चित्र पूर्ववत राहून, सर्वसामान्य जनता होकारात्मकतेने व्यवस्थितरीत्या कार्यरत राहू दे हेच मनोभावे साकडे घातले आहे.

 

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About 90 hours of ganesh immersion procession in kolhapur zws
First published on: 14-09-2019 at 04:19 IST