कोल्हापूर : ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आले नसल्याचा परिणाम सोमवारी शासकीय कार्यक्रमावर दिसून आला. यामुळे नागरिकांनी कार्यक्रमाकडे येण्याचे टाळल्याने रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यक्रम आवरावा लागला.
गेले दोन आठवडे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या कार्यक्रमाचा प्रचार केला जात आहे. १२ व्हॅनद्वारे गावोगावी प्रचार चित्ररथ जात आहे. यावरून काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले आहेत. सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथे चित्ररथाच्या माध्यमातून मोदी व भाजपचा प्रचार केला जात असल्याचा आक्षेप संविधान परिषदेचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी उपस्थित केला होता. यामुळे तेथून रथ हलवण्याची वेळ आली होती. कोल्हापूरमध्ये असेच आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केल्याने चित्ररथ दुसरीकडे न्यावा लागला होता. तर आज हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा – कोल्हापूर : पेठ वडगांवातील पक्षी गणनेमध्ये ९४ प्रजातींची नोंद; २४ स्थलांतरित प्रजाती
नागरिकांची पाठ
आज येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’साठी राज्यपाल रमेश बैस आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे येणार असल्याने जय्यत तयारी केली होती. त्यांनी कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवल्याने नागरिकांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. सभागृहात खुर्च्या रिकाम्या राहिल्या.
स्टॉल सुनेसुने
जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी उभारलेले स्टॉल्सही सुनेसुने राहिले.