शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या गळती काढण्याचे काम शुक्रवारी आणखी गतीने करण्यासाठी प्रशासन झटत राहिले. तब्बल चार ठिकाणच्या मोठय़ा स्वरूपाच्या गळती काढण्यात येत असून रात्री १२ वाजता १ पंप सुरू करण्यात आला, तर आणखी ३ पंप शनिवार सकाळपर्यंत सुरू होतील असे जल अभियंता मनीष पवार यांनी सांगितले. या कामासाठी १०० लोकांचे हात राबत राहिले. या कामावर सुमारे १५ लाख रुपये खर्च होणार आहेत. शहरातील निम्म्याहून अधिक भागास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने आज त्याच्या ८८ खेपा झाल्या .
शहरात पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. शहर पाणीपुरवठा विभागाने केलेल्या नियोजनानुसार गळती काढण्याचे काम सुरू झाले असून निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आज अयोध्या पार्क येथील पाचशे मीटरची जलवहिनी क्रॉस कनेक्शन जोडण्यात आले. तर विश्वजित हॉटेल परिसरात सायंकाळी ७ वाजता काम पूर्ण झाले.
फुलेवाडी जकात नाका येथे जेसीबी, क्रेन, पोकलॅँड, वेिल्डग मशिन्स, गॅस कटर, जनरेटर सेट अशी यंत्रणा वापरून काम पूर्ण केले. जलअभियंता मनीष पवार, उपजलअभियंता प्रभाकर गायकवाड, शाखा अभियंता बी. एम. कुंभार यांच्यासह १०० लोक काम करत आहेत .
पाणीपुरवठा करताना अपघात
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या टँकरचालकाचा टॅकरवरील ताबा सुटल्याने टँकर रस्ता दुभाजकावरून पलीकडे जाऊन एका टेम्पोस धडकला. यामध्ये टेम्पो चालक महादेव कृष्णात रोहिले (वय २८, रा. सांगरुळ, ता. करवीर) हा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात संभाजीनगर येथील रेसकोर्स नाक्यानजीक घडला.
शिंगणापूर पाणी योजनेतील गळती काढून पाइपलाइन बदलण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे शहराला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापालीकेचा टँकर (एम०९- बीसी- २५६१) घेऊन चालक कळंबा फिल्टर हाउसकडे निघाला होता. संभाजीनगर रेसकोर्स नाका परिसरात आला असता चालकचा टँकरवरील ताबा सुटला. टँकर रस्ता दुभाजकावरून पलिकडच्या बाजूस गेला व संभाजीनगरकडून पाण्याच्या खजिन्याकडे जाणारा टेम्पो (एम०९- सीडी-७६६२) ला जोराची धडक दिली. यामध्ये टेम्पोचालक महादेव रोहीले गंभीर जखमी झाला. त्याच्या पायास इजा पोहोचली. अपघातानंतर टँकरचालकाने गाडी रस्त्यावरच सोडून पळ काढला. दोनही वाहने रस्त्यातच असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापूरच्या ‘पाणीबाणी’विरुद्ध प्रशासनाची लढाई
चार ठिकाणच्या मोठय़ा स्वरूपाच्या गळती काढण्यात यश
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-04-2016 at 03:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration fight against water problem in kolhapur