खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण आदी गंभीर प्रकारच्या दहा गुन्ह्यांत तारदाळ येथील अमोल अशोक माळी याच्यासह आठजणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पावले टाकली असून त्याचाच हा एक भाग आहे. इचलकरंजी व परिसरात मोक्काअंतर्गत ही पहिलीच कारवाई आहे.
अमोल अशोक माळी (रा. तारदाळ) याच्यासह सुरज मनोहर शिर्के (वय २०), अजय भानुदास कुलकर्णी (वय २९), अनिल संपत मोळे (वय ३१, सर्व रा. श्रीरामनगर तारदाळ), तौफिक अब्दुल शिरगुप्पे (वय ३१), बसवेश्वर उर्फ राहुल विश्वनाथ एकोंडे (वय २१), अमोल प्रभाकर कोंडारे (वय २६, तिघे रा. आझादनगर तारदाळ) व अक्षय बबन कमे (रा. शहापूर) यांचा त्यामध्ये समावेश आहे. याद्वारे संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून शहर व परिसरातील गुन्हेगारांवरही अशी कारवाई करण्यात येईल, असे बारी यांनी सांगितले. बारी पुढे म्हणाले, एप्रिल २०१६ मध्ये अजित वाघमारे याचे अपहरण करून खून तसेच तारदाळ व इचलकरंजी परिसरातील उद्योग व्यावसायिकांकडून संरक्षणाच्या नावाखाली खंडणी उकळणे, अवैध व्यवसायांच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होणे, राजकीय पाश्र्वभूमीचा फायदा घेत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यात ही टोळी अग्रेसर होती.
सर्वच संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचे ३, खुनासाठी मनुष्य पळविणे १, खंडणीचे २, परवाना नसताना शस्त्रे बाळगण्याचा १, मारामारीचे ४ असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर उपरोक्त गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कलमे लावून तो पुढील तपासासाठी करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
यावेळी पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गावभागचे पोलीस निरीक्षक अरुण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष डोके आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2016 रोजी प्रकाशित
अमोल माळीसह आठजणांवर मोक्का अंतर्गत कारवाई
राजकीय पाश्र्वभूमीचा फायदा घेत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यात ही टोळी अग्रेसर होती.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-07-2016 at 01:07 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mali with eight other face action under mcoca law