येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने बुधवारी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. पुतळा उभारणीला करवीर नगरीतील रणरागिणींच्या शौर्याचा इतिहास आहे.

येथील छत्रपती शिवाजी चौकात आजही अनेक आंदोलनांबरोबरच सामाजिक बदलांची नांदी होत असते. ७५ वर्षांंपूर्वी शिवाजी पेठेतल्या भागीरथीबाई तांबट आणि जयाबाई हवेरी या दोन स्वातंत्र्यसैनिक महिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संगमरवरी लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला होता. विल्सनचा नवा पुतळा उभा करण्याची तयारी ब्रिटिशांनी केल्यावर विरोध होऊ लागला. नेमकी हीच संधी साधत ब्रिटिशांचा विरोध झुगारत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.

पाठय़पुस्तकात धडा असावा या ऐतिहासिक घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण झाल्याने पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराजांचा जयघोष करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या ऐतिहासिक घटनेची नोंद शालेय पाठय़पुस्तकात करण्याची मागणी करण्यात आली.

‘१९४२ पासून तर ‘चले जाव’ च्या माध्यमातून स्वातंत्र्याचा लढा निर्णायक टप्प्यावर असताना उभारलेल्या या पुतळ्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अन्याय, बेबंदशाहीविरूध्द क्रांतीची बीजे पेरतच राहील,’ असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केले.