राजकीय मशागत करण्यासाठी कोल्हापूरच्या शिवारात पाऊल टाकले. गटबाजीचे तणकट उपटून टाकण्यासाठी हातही घातला. शेजारच्या ‘स्वाभिमानी’ मळ्यात मत्रीची नांगरट केली. पण, इतके करूनही खळं भरणार का वा उगवण कशी होणार यावर अवलंबून. तणाचा समूळ नाश होत नाही तोवर गटबाजीचे तणनिर्मूलन झाले असे म्हणता येणार नाही. आणि मत्रीचे खळे खरेच भरल्याशिवाय मशागतीलाही अर्थ नाही.. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या कोल्हापूर शिवार दौऱ्याचे हे फलित. सकारात्मक अंगाने जाणारा तरीही अपूर्णतेची किनार असलेला. यापूर्वी आलेल्या अन्य दोघा प्रमुखांच्या दौऱ्यात राजकीय उलथापालथ अजिबात नसल्याच्या पाश्र्वभूमीवर अशोकरावांचा दौरा मात्र काहीसा सरस ठरलेला. किमान बेरजेची समीकरणे गिरवण्यास प्रारंभ तरी करणारा म्हणून.
कोल्हापूरचा काँग्रेसचा राजकीय आखाडा म्हणजे गटबाजीने जराजर्जर झालेला. जितके नेते, तितके गट. गटबाजीची लागण झाल्याने एकोप्याची घडी पार विस्कटून गेलेली. परिमाणी कोल्हापूर जिल्ह्य़ातील काँग्रेसचा बालेकिल्ला पुरता ढासळलेला. इतके होऊनही गटबाजीला आवर घालण्याची मनापासूनची इच्छा कोणाकडेही नाही. त्यामुळे या गटबाजीवर जालीम मात्रा देण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष या नात्याने अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर येऊन ठेपलेली. आमदार सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आलेल्या चव्हाण यांना गटबाजीला आवर घालण्यासाठी चांगलीच डोकेफोड करावी लागली.
रंग गटबाजीचेच
जिल्हा काँग्रेस भवनातील कार्यक्रमावेळी चव्हाण यांना गटबाजीचेच दर्शन झाले. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी मनातील मळमळ व्यक्त करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यावर निशाणा साधला. कोल्हापूर जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण घरभेद्यांमुळे तो ढासळला. पूर्वी एकजात सारे आमदार- खासदार काँग्रेसचे निवडून येत होते. आता परिस्थिती उलटी झाली आहे. याला लोक जबाबदार आहेत. अशांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, अशी मागणी केली. पण ही गटबाजी चव्हाण यांच्या लेखी ‘किरकोळ’ ठरली. शिवाय जिल्हय़ातील हा वाद ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी मिटवावा. यासंदर्भात ते जो निर्णय घेतील, तो मान्य केला जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. जिल्हा काँग्रेसमधील कार्यक्रमाला काँग्रेसवर नाराज असलेल्या आवाडे यांनी दांडी मारल्याने त्यांना घेऊन चव्हाण यांनी तासभर बंद खोलीत बसावे लागले. इतके करूनही आवाडे यांची नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट होत नाही. याला कारण त्यांना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद हवे असल्याचे सांगितले जाते. त्यास जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांचा टोकाचा विरोध आहे. तर, चव्हाण यांच्या दौऱ्याच्या आयोजनावर एकहाती वर्चस्व असलेले आमदार सतेज पाटील यांचा डोळा याच जिल्हाध्यक्षपदावर आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी आवाडे यांची नाराजी दूर करण्यासाठी चव्हाण यांची भेट घडवून समेट करण्याचा प्रयत्न केला.
शत्रूचा शत्रू तो मित्र
अशोक चव्हाण यांच्या दौऱ्यातील पूर्वरंगापेक्षा उत्तररंग अधिक लक्षवेधी ठरला. पूर्वार्धात त्यांना पक्षीय वादावर तोडगा काढण्यासाठी मेहनत करावी लागली. पण, उत्तरार्धात बेरजेच्या समीकरणावर भर दिला गेला. पंचगंगाकाठी पक्षीय ऐक्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चव्हाण यांनी कृष्णाकाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. वरकरणी ही भेट सस्मित मुद्रेने परस्परांना आिलगन दिलेल्या दोन खासदारांची होती. पण, या गळाभेटीमागील मूळचा अर्थ होता तो केंद्र – राज्यातील भाजपच्या सत्तेला रोखण्याचा. शेट्टी हे सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडले असून शेती प्रश्नांवर पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी चौफेर टीका सुरू केली आहे. शेट्टी यांची भाजपवर मोठी नाराजी आहे. त्यामुळे असा लढवय्या शेतकरी नेत्याची काँग्रेसला साथ मिळाली तर ती हवीच आहे. भाजपविरोधात काँग्रेसला मोट बांधणे यामुळे सोपे जाणार आहे. चव्हाण-शेट्टी यांची भेट घडवून आणण्यात सतेज पाटील यांनी प्रयत्न केले. यामागे तेथे उपस्थित असलेले शेट्टी – आवाडे यांचे पाठबळ मिळाल्यास जिल्हा परिषदेत भाजप- महाडिक यांची सत्ता हटवून काँग्रेसची सत्ता येऊ शकते हा बेरजेच्या राजकारणाचा विचार होता. देवेंद्र फडणवीस -उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात बेरजेचे राजकारण घडले नव्हते, तुलनेत चव्हाण यांनी शेट्टीसारखा मित्र जोडण्याची संधी साधली. मात्र, चव्हाण यांच्या सोबतच्या भेटीत कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली, असे सांगत राजू शेट्टी यांनी इतक्यात आपण काँग्रेसला प्रतिसादाची ‘टाळी’ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचा हा पवित्रा पाहता जोवर टाळी मिळत नाही तोपर्यंत काँग्रेसला आणखी एक मित्र जोडल्याच्या लटक्या आनंदावर राहावे लागणार आहे. सदाभाऊ खोत आणि भाजप विरोधात गेल्याने खासदार शेट्टी यांनाही नव्या मित्रांची आवश्यकता आहे. नवे मित्र मिळाल्याशिवाय लोकसभेचा मार्ग सुकर होणार नाही. राष्ट्रवादीशी कायम दोन हात केले. त्या तुलनेत काँग्रेस हा पर्याय शेट्टी यांच्यासमोर असू शकतो.