कोल्हापुर : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आवाजाच्या भिंती व प्रखर विद्युत झोतचा (लेझर लाइट) अतिरेकी वापर वाढत आहे. यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पार्श्वभूमीवर इचलकरंजीत जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली माई टी.बी. क्लिनिक पासून सुरू होऊन शिवतीर्थ, मलाबादे चौक, प्रांत कार्यालय येथे निवेदन देऊन पार पडली. डॉ. अमित देशमुख यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. पी. मर्दा, डॉ. गोविंद ढवळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सह संघचालक भगतराम छाबडा, उद्योगपती शामसुंदर मर्दा, बजरंग लोणारी यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.
आरोग्यावर घातक परिणाम
उत्सव काळातील प्रचंड आवाजामुळे कानातील श्रवणेंद्रियांवर ताण येतो व अनेकांना कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याचा धोका असतो. हृदयविकाराचा झटका, मज्जासंस्थेचे विकार, लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम, तरुण व वृद्धांमध्ये अनिद्रा, चिडचिडेपणा अशा समस्या वाढतात. दुसरीकडे, लेझर लाइटच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांची दृष्टी जाणे, डोळ्यांच्या पेशींना अपूरणीय इजा होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. काहीवेळा हृदय बंद पडण्याची शक्यता असते. आवाज व ध्वनिच्या तीव्रतेचे आरोग्य समस्यांमध्ये रोजच वाढतंय. एका आरोग्य सर्वे नुसार अधिक ध्वनिच्या ठिकाणी काम करणारी माणसे चिडचिड असतात. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब सुद्धा वाढतो. डोकेदुखी वाढते. बहिरेपणा येऊन कानाचे आजार देखील होतात. प्रमाणापेश्या जास्त ध्वनिमुळे “निरोसिस ” होतो. नियम ५ व ६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६मधील कलम १५ अन्वये ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केले जात असेल तर त्यासाठी पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदीप्रमाणे ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्रही आहे.
रॅलीत मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स, मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी, डेंटल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, इचलकरंजी नागरिक मंच, रोटरी क्लब ऑफ सेन्ट्रल,रोटरी क्लब, अंधश्रद्धा निर्मूलन संघ, ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष अभिजीत पटवा , उपाध्यक्ष उमेश नाना पाटील , विद्यासागर चराटे , मनोरंजन मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय होगाडे, सी ए असोसिएशन,शिवाजीनगर पोलीस स्टेशन, राष्ट्र सेवा दल, बजरंग दल, माई महिला मंडळ आदी सामाजिक संस्थां तसेच सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह ५० पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते. नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले.
(इचलकरंजीत जनजागरण रॅलीला प्रतिसाद मिळाला.)