scorecardresearch

Premium

कोल्हापुरात बंद दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला सोमवारी कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

बंद
बंद

‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

कोल्हापूर : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला सोमवारी कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तब्बल २१ पक्षांनी पाठिंबा देऊनही या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डाव्या पक्षांनी आपापले अस्तित्व दाखवण्यासाठी फेरी काढत मोदी सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, आजच्या या आंदोलनावेळी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्येच तुंबळ हाणामारी झाल्याने शहरभर हाच चर्चेचा विषय होता.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली होती. बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह २१  राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. एवढे पक्ष सहभागी असूनही या बंदचा म्हणावा तसा परिणाम दिसून आला नाही. शहराच्या शाहूपुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड आदी भागांतील दुकाने सकाळपासून बंद होती. एसटी, रिक्षा, केएमटी यांची वाहतूक नियमितपणे सुरू होती.  काँग्रेस भवनापासून काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात रॅली काढली.

शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महापौर शोभा बोंद्रे, महिला आघाडी अध्यक्षा संध्या घोटणे यांच्यासह कार्यकर्ते घोषणा देत सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागांतून निघालेल्या रॅलीची सांगता काँग्रेस भवनात झाली.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

या रॅलीवेळी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्येच झालेली तुंबळ हाणामारी लक्षवेधी ठरली. घोषणाबाजी करण्यावरून दोघांमध्ये ही हाणामारी झाली. यामुळे काही काळ रॅलीत गोंधळाचे वातावरण होते. सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करण्याऐवजी आपापसात कार्यकर्ते संघर्ष करताना पाहून बघ्यांची चांगलीच करमणूक झाली, तर काँग्रेस टीकेची कारण बनली. अन्य कार्यकर्त्यांनी यात मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला.

उंटावरचा शहाणा

डाव्या लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आजच्या आंदोलनाला वेगळेच वळण दिले. त्यांनी रॅलीमध्ये एक उंट आणला. हलगी-ताशाच्या गजरात दरवाढ करणाऱ्या सरकारची ‘उंटावरचे शहाणे’ अशी उपहासात्मक खिल्ली उडवली. या आगळय़ावेगळय़ा प्रकारच्या आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधले गेले. ‘ऑल इंडिया स्टुडंड फेडरेशन’च्या कार्यकर्त्यांनी मोदी-फडणवीस यांच्या नावाने हल्लाबोल घोषणा देत निषेध नोंदवला. जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकार विरोधातील लढा सुरूच राहील, असे गिरीश फोंडे या वेळी म्हणाले.

स्वाभिमानीचे साखर वाटप

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजारामपुरी येथील कोंडुसकर पेट्रोल पंपासमोर आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या.  पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल सुरू असल्याने  वाहनधारकांना साखर वाटप करून  वाहनधारकांना पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा देत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे, शहराध्यक्ष रमेश भोजकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bharat bandh get mixed response in kolhapur

First published on: 11-09-2018 at 02:55 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×