सतेज पाटील यांना रोखण्याची भाजपची रणनीती

जिल्ह्य़ात या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस विरुद्ध भाजप हा वादाचा नवा अध्याय बघायला मिळेल.  

सतेज पाटील

दयानंद लिपारे, लोकसता 

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत विद्यमान सदस्य व पालकमंत्री बंटी ऊर्फ  सतेज पाटील यांना रोखण्यासाठी भाजप तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. जिल्ह्य़ात या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस विरुद्ध भाजप हा वादाचा नवा अध्याय बघायला मिळेल.  

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गृहराज्यमंत्री असतानाही सतेज पाटील यांना भाजपच्या नवख्या अमल महाडिक यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी या आखाडय़ात प्रथमच उतरताना त्यांचे एकेकाळचे राजकीय गुरू, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी पराभव केला होता.

आघाडीचा वाढता प्रभाव

गेल्या सहा वर्षांमध्ये जिल्ह्य़ात राजकीय चित्र बदललेले आहे. सध्या जिल्ह्य़ात भाजपचा एकही आमदार नाही तर काँग्रेसचे ५, शिवसेनेचे एक आणि राष्ट्रवादीचे व अपक्ष प्रत्येकी २ आमदार आहेत. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. महापालिकेची मुदत संपल्याने हक्काची मते पाटील यांना गमवावी लागली आहेत. त्यांना जिल्ह्य़ातील १४ नगरपालिका, जिल्हा परिषदेचे ६५ सदस्य अशा ४०६ उमेदवारांनी संपर्क साधावा लागणार आहे. यंदा पाटील हे काँग्रेसकडून पुन्हा लढणार असले तरी निवडणूक आघाडीच्या माध्यमातून व्हावी असा राज्य पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याने शिवसेनेची मते पाटील यांच्या पारडय़ात पडू शकतात. इचलकरंजीत काँग्रेसने निवडणूक प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. आता आवाडे यांचा कल भाजपकडे आहे. यामुळे ही मते कोणाकडे जाणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जिल्हा परिषद सदस्यांना विकासासाठी निधी दिला आहे. या वेळी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचा अधिक फायदा होईल. विनय कोरे यांचीही साथ मिळू शकते. यामुळे विजयाचा मार्ग सुकर होईल,’ असे सतेज पाटील यांनी  सांगितले.

‘विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाही,’ असे विधान ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘निवडणूक जाहीर होऊ दे असा इशारा दिला होता. प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव पुढे आले असले तरी त्यांनी अद्याप अधिकृत मत व्यक्त केलेले नाही. कोल्हापूर महापालिकेचे सदस्य मतदार नसल्यामुळे आणि नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व असल्याने आणखी थोडय़ा मतांची ‘जोडणी’ करायची. विनय कोरे व प्रकाश आवाडे यांनी राज्याच्या राजकारणात भाजपला पाठिंबा दिला असल्याने त्यांचीही मदत मिळाल्याने विजयाचे गणित जमू शकते, असे समीकरण भाजपच्या गोटात आहे.

महाडिक कुटुंब तळ्यात मळ्यात

विधान परिषद निवडणुकीत तीन वेळा विजय मिळवलेले महादेवराव महाडिक यांच्यासह कुटुंबीयांची भूमिका अद्याप अनिश्चित आहे. ‘निवडणूक आजच जाहीर झाली आहे. ती लढवणेबाबत कुटुंबात विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल,’ असे महादेवराव महाडिक यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची याबाबत त्यांची स्पष्टता नाही. खुद्द महादेवराव महाडिक हे कालपर्यंत काँग्रेसशी संबंधित असल्याचे सांगत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp s strategy to defeat satej patil in mlc election zws

Next Story
कामगार संघटनांच्या बंदला कोल्हापुरात प्रतिसाद
ताज्या बातम्या