कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या सरंजामी नेतृत्वामुळे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, विद्यार्थी, शेतकरी आत्महत्या अशा असंख्य प्रश्नांना अनुत्तरीत ठेवले आहे. जनतेतील या नाराजीचे ठोस उत्तर म्हणून पोटनिवडणुकीत मतदार भाजपाला विजय मिळवून देईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले, महाविकास आघाडीने कोल्हापूरला कधीच मोठे होऊ दिले नाही. राज्याचा विकासही रखडला आहे. करोना काळातही जनतेला आर्थिक साहाय्य राज्य सरकारकडून मिळाले नाही. याउलट कधी ऑनलाइन-ऑफलाइन शाळा, परीक्षा या साऱ्याच गोंधळामुळे राज्यात शैक्षणिक अराजकताच निर्माण केली. विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखत्या आल्या नाहीत. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या प्रकरणाने तर राज्यातील सारा भ्रष्टाचार जनतेच्या समोर आला आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांचा संपही अजूनही सुरूच आहे. या साऱ्यावर कसलाच तोडगा काढलेला नाही. आघाडीच्या कारभारावर नाराज असलेल्या जनतेचा कौल पोटनिवडणुकीत दिसेल.

आप पोटनिवडणुकीत रिंगणातून बाहेर

कोल्हापूर : लढणार. लढणार अशी जोरदार हवा करून अखेर आम आदमी पक्षाने कोल्हापूर पोटनिवडणुकीत रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून आम आदमी पक्षात उत्साहाला उधाण आले होते. इच्छुकांनी समाज माध्यमातून आपल्या उमेदवारीचा डंका पिटण्यास सुरुवात केली होती. पंजाब विधानसभा निवडणूक जिंकल्यावर कोल्हापूर काबीज करणार अशी गर्जना सुरू झाली होती. प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. मात्र अखेरच्या क्षणी आपने देशातील कोणतीही पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कोल्हापूरचाही समावेश असल्याने इच्छुकांचा आशेवर पाणी पडले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps victory by elections peoples displeasure leadership maratha reservation obc reservation displeasure people ysh
First published on: 25-03-2022 at 00:33 IST