कोल्हापूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी व शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भर पावसात काळे झेंडे दाखवण्यात आले.
मुख्यमंत्री काल सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सांगली येथील कार्यक्रम संपवून ते कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत मजले ( ता. हातकणंगले) येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे जाहीरनाम्यात सांगितले होते. परंतु आता उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफी करता येणार नाही, अशी विधाने करीत आहेत. याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मजले येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच होऊ घातलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा फटका सांगली – कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना बसणार आहे. महापुरास हा रस्ता कारणीभूत ठरणार असल्याने तो रद्द करावा यासाठीही हे आंदोलन करण्यात आले. फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे तातडीने कर्जमाफी करावे, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.